राज्यातील १४७ रस्ते अ‍ॅन्युटीमधून करणार

0

६०:४० चा रेषो ठेवला जाणार
विधानसभेत सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांची माहिती

मुंबई :-राज्यातील १४७ रस्ते अ‍ॅन्युटीमधून करण्याचा निर्णय घेतला आहे. यापैकी ८० रस्त्यांच्या निविदा काढण्यात आल्या असून ६७ रस्त्यांच्या निविदा काढलेल्या नाहीत. ही रस्ते अ‍ॅन्युटीमधून करण्यासाठी ठेकेदार जाचक अटी मुळे पुढे येत नसल्याने दहा वर्षासाठी देखभाल व दुरस्ती करण्याकरिता ६०:४० चा रेषो ठेवण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक भूमिका घेतली आहे. अशी माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी विधानसभेत दिली.

कोल्हापूर जिल्हयातील कागल-निढोरी रस्त्याची दुरुस्ती करण्यासंदर्भात विधानसभा सदस्य हसन मुश्रीफ यांनी तारांकित प्रश्न विचारला होता. या प्रश्नाला उत्तर देतांना सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले निढोरी-गोरंबे-कागल-सांगाव-यडगुळ हा रस्ता राज्यमार्ग १९५ चा भाग आहे. या भागात रस्त्यावरील खड्डे बुजविण्यात आले आहे. निधीला मंजूरी मिळताच या भागातील रस्त्यांची कामे हाती घेतले जातील. शिवसेनेचे आमदार सुभाष साबणे यांनी या संदर्भात अ‍ॅन्युटीमधून रस्ते करण्यास मुख्यमंत्र्यांनी स्थगिती दिल्याचा मुद्दा उपस्थित केला.

यावर मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले राज्यातील १४७ रस्ते अ‍ॅन्युटीमधून करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यापैकी ८० कामांच्या निविदा काढण्यात आल्या आहेत. अ‍ॅन्युटीमधून रस्ते करण्यासाठी ठेकेदारांनी नियमातील ४०:६० ची अट रद्द करण्याची मागणी केली आहे. मुख्यमंत्र्याकडे या संदर्भात तक्रार केली आहे. मुख्यमंत्र्यांनी यामध्ये लक्ष घातले असून ६०:४० असा रेषो ठेवण्याच्या दृष्टीने सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन दिले. त्यामुळे रेषो बदलला जाणार असल्यामुळे दहा वर्षासाठी रस्त्याच्या देखभाल दुरूस्तीचे काम ठेकेदारांनी तयारी दर्शवली आहे. लवकर अ‍ॅन्युटीमधून रस्त्यांची कामे सूरू केले जातील.असे मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.