मुंबई । राज्यातील 10 महानगरपालिकांच्या निवडणुका या पुढील महिन्यातच होणार असल्याची माहिती राज्याचे मुख्य निवडणूक आयुक्त जे. एस. सहारिया यांनी दिली आहे. निवडणूक आयोगाने त्यासाठी तयारीही पूर्ण केल्याची माहिती त्यांनी दिली. महापालिका आयुक्त आणि जिल्हाधिकार्यांना त्या संबंधीच्या सूचना देण्यात आल्या असून पुढच्या काही दिवसात याबाबत अधिकृत घोषणा होणार आहे. जिल्हा परिषद आणि महापालिकांच्या निवडणुका मुदत संपण्यापूर्वी घेणे आवश्यक आहे. मात्र मार्च महिन्यात दहावी आणि बारावी बोर्डाच्या परीक्षा असल्याने निवडणुका फेब्रुवारीत महिन्यातच घेण्यात येणार असल्याचे सहारिया यांनी स्पष्ट केले आहे.
यावेळी नवीन दोन संकल्पना राबविणार
यावेळेस नवीन दोन संकल्पना अंमलात आणणार असल्याचे सहारिया यांनी सांगितले असतांना उमेदवारांचे नामनिर्देशनपत्र आणि शपथपत्र संगणकाच्या माध्यमाने स्विकारणार असून हस्तलिखित नामनिर्देशनपत्र चालणार नाही. यामुळे उमेदवारांचे अर्ज रदद्चे प्रमाण कमी होणार आहे. मतदारांना योग्य निर्णय घेता यावा यासाठी उमेदवारांनी दिलेले शपथपत्र (शिक्षण, संपत्ती, गुन्हे माहिती) चा गोषवारा वर्तमानपत्रात छापला जाईल. मनपा मतदानाच्या दिवशी मतदान केंद्राच्या बाहेर फ्लेक्स लावून सर्व माहिती त्यावर छापली जाणार असल्याची माहिती मुख्य निवडणूक अधिकारी जे.एस. सहारिया यांनी दिली. पुढील मुंबई, पुणे, पिंपरी-चिंचवड, ठाणे, उल्हासनगर, नाशिक, नागपूर, अकोला, अमरावती, सोलापूर या पालिकांच्या निवडणूका होणार आहे.