राज्यातील 12 जिल्ह्यांवर दुष्काळाचे सावट!

0
जळगाव, धुळे, नंदुरबारसह 12 जिल्ह्यांमध्ये परिस्थिती भीषण
निलेश झालटे
मुंबई : मोठ्या थाटात जलयुक्त शिवार सारख्या योजनांचा गाजावाजा करून देखील यंदा कमी पाऊस झाल्याने त्यातही पाण्याची टंचाई आणि त्यामुळे वाया गेलेल्या पिकांमुळे राज्यावर विशेषतः मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रावर दुष्काळाचे सावट आले आहे. यामुळे ऐन निवडणुकांच्या तोंडावर सरकारला यावर उपाययोजना करताना नाकेनऊ येणार आहे. राज्यातील 12 जिल्ह्यांतील 170 तालुक्यांत सरासरीच्या 75 टक्के पेक्षा कमी पाऊस झाला असून या भागांतील पिकेही धोक्यात आली आहेत. या पार्श्वभूमीवर उत्तर महाराष्ट्रातील धुळे, नंदूरबार,जळगाव आणि अहमदनगर सह मराठवाड्यातील औरंगाबाद, उस्मानाबाद, जालना, नांदेड, परभणी, बीड, लातूर, हिंगोली या जिल्ह्यांत दुष्काळ जाहीर करण्याची प्रक्रिया सरकारने सुरू केली आहे. त्यानुसार कमी पाऊस झालेल्या तालुक्यांमध्ये पिकांचे पंचनामे करण्याचे आदेश महसूल विभागास देण्यात आले आहेत. दुष्काळ जाहीर करण्याबाबत केंद्राच्या निकषानुसार ही प्रक्रिया सुरू करण्यात आली असून लवकरच दुष्काळ जाहीर करण्याबाबतचा अंतिम निर्णय होईल, अशी माहिती सूत्रांनी दिली.
सूत्रांच्या माहितीनुसार राज्य मंत्रिमंडळाच्या बुधवारी झालेल्या बैठकीत राज्यातील टंचाई परिस्थितीवर चिंता व्यक्त करण्यात आली. राज्यात गेल्या दोन वर्षांत सर्वत्र समाधानकारक पाऊस झाला होता. त्यामुळे गेल्या वर्षी गोंदिया जिल्ह्यातील केवळ चार तालुक्यांत दुष्काळ जाहीर करण्यात आला होता. यंदा मात्र परिस्थिती विपरीत आहे. सुरुवातीस राज्यात सर्वदूर पडलेल्या पावसाने नंतर  दडी मारल्याने यंदा पुन्हा एकदा मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. केंद्र सरकारच्या ‘नॅशनल सेंटर फॉर क्रॉप फोरकास्टिंग’ संस्थेकडून या सर्व तालुक्यातील पिकांच्या सद्यस्थितीचा अहवाल मागविण्यात आला असून येत्या चार दिवसात हा अहवाल मिळेल. त्यानंतर केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सुचनांनुसार निकषात बसणाऱ्या तालुक्यामध्ये दुष्काळ जाहीर करण्यात येणार आहे.
राज्यावर येऊ घातलेल्या या संभाव्य दुष्काळाच्या सावटाचे आयते कोलीत विरोधकांच्या हाती मिळू नये यासाठी आतापासूनच उपायोजना करण्याच्या सूचना देण्यात आल्या असून सरकार शेतकऱ्यांच्या पाठिशी खंबीरपणे उभे असल्याचा संदेश लोकांपर्यंत जाऊ देण्याची खबरदारी घेण्याच्या सूचना सबंधित यंत्रणांना देण्यात आल्या आहेत. राज्यातील धरणांमधील आजचा एकूण पाणीसाठा 26 हजार 736 दशलक्ष घनमीटर असून तो प्रकल्पीय पाणी साठ्याच्या 65.48 टक्के आहे. त्यातही मराठवाडय़ातील पाणीसाठा जेमतेम 27.76 टक्के असून नाशिक विभागातील पाणीसाठा 64.95 टक्के आहे.पहिल्या टप्यात ज्या 170 तालुक्यात 75 टक्के पेक्षा कमी पाऊस झाला आहे, तिथे पिकांचे पंचनामे करण्याच्या सूचना महसूल अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत.