पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा महत्वांकांक्षी प्रकल्प असलेल्या बेटी बचाओ, बेटी पढाओ अभियानाला देशभरात चांगला प्रतिसाद मिळत असून, या अभियानामुळे गेल्या तीन वर्षांत राज्यातील 15 जिल्ह्यांमध्ये मुलींचे प्रमाण वाढले आहे, अशी माहिती या अभियानाचे प्रदेश संयोजक श्याम सातपुते यांनी दिली. स्त्रीभ्रूणहत्या रोखण्यासाठी अभियानाद्वारे करण्यात आलेली जनजागृती व मुलींच्या शिक्षणासाठी करण्यात येत असलेल्या प्रबोधनाची ही फलनिष्पत्ती असल्याचेही सातपुते यांनी सांगितले. श्री सातपुते यांनी दैनिक जनशक्तिच्या पुणे आवृत्ती कार्यालयास गुरुवारी सदिच्छा भेट दिली. याप्रसंगी ते संवाद साधताना बोलत होते. निवासी संपादक पुरुषोत्तम सांगळे यांनी त्यांचे यथोचित स्वागत केले. सहसंपादक अजय सोनावणे, वृत्तसंपादक राजेंद्र पंढरपुरे, वरिष्ठ उपसंपादक अंजली इंगवले, भक्ती शानभाग, प्रदीप माळी, सोनिया नागरे यांची याप्रसंगी प्रामुख्याने उपस्थिती होती.
राज्यातील 16 जिल्ह्यांच्या लिंग गुणवोत्तरात वाढ
देशाच्या शाश्वत विकासासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनधन योजना, स्वच्छ भारत अभियान, मेक इन इंडिया या अभियानानंतर बेटी बचाओ, बेटी पढाओ हे अभियान हाती घेतले आहे. त्याअंतर्गत देशभरात स्त्रीभ्रूण हत्या रोखणे, मुलींना शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून देणे व त्यांच्या आरोग्याची काळजी घेणे आदींबाबत जनजागृती केली जात असून, मुलींच्या सर्वांगिण विकासासाठी या अभियानाद्वारे काम उभे केले जात आहे. देशाच्या तुलनेत या अभियानाला गेल्या तीन वर्षाच्या अथक प्रयत्नानंतर महाराष्ट्रात चांगले यश लाभत असल्याचे याप्रसंगी अभियानाचे राज्य संयोजक श्याम सातपुते यांनी सांगितले. अभियानाचे अखिल भारतीय संयोजक डॉ. राजेंद्र फडके यांच्या नेतृत्वात राबविण्यात येत असलेल्या या अभियानामुळे 16 जिल्ह्यांच्या लिंग गुणवोत्तरात चांगलीच सुधारणा झाली आहे. 15 जिल्ह्यांत तर मुलींच्या संख्येत लाक्षणीय वाढ झाल्याचे दिसून आले. त्यामुळे अभियानामुळे लोकांमध्ये व खास करून महिलावर्गात जागृती निर्माण करण्यात यश आले. शाळांच्या पटसंख्येतही मुलींची संख्या चांगली वाढल्याने मुलींना शैक्षणिक प्रवाहात आणण्यात यश येत असल्याचे दिसून येते ही समाधानाची बाब आहे. मोदी सरकारचे हे चौथे मोठे अभियान आहे. भारतीय जनता पक्ष पातळीवर ते यशस्वी करण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य होत असले तरी, सर्वसामान्य नागरिक व कुटुंबे या अभियानात मनापासून सहभागी होत आहे, ही त्यातल्या त्यात सर्वात मोठी दिलासादायक बाब असल्याचेही सातपुते यांनी सांगितले.
देशभरात 88 ठिकाणी ‘हर मॅजेस्टी’चे आयोजन
या अभियानांतर्गत गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या नुकत्यात पार पडलेल्या 88 व्या वाढदिवसाचे औचित्य साधत देशात विविध ठिकाणी व विदेशात एका ठिकाणी अशा एकूण 88 सांगीतिक कार्यक्रमांची मैफल आयोजित केली जात असल्याचेही सातपुते यांनी सांगितले. या मैफिलींची सुरुवात 5 नोव्हेंबरच्या ठाणे येथील कार्यक्रमाने झाली आहे. राज्यात 40 ठिकाणी हा कार्यक्रम होणार असून, पुढील दोन महिन्यांत देशातील अन्य भागातही हे कार्यक्रम आयोजित केले जाणार आहेत. या मालिकेतील शेवटचा कार्यक्रम भव्यदिव्य अशा प्रमाणात जानेवारीमध्ये मुंबईत घेतला जाणार आहे. त्या कार्यक्रमात चित्रपट, संगीत, राजकीय तसेच अन्य क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती लाभणार आहे. या शिवाय, देशभरात 88 ठिकाणी होणार्या कार्यक्रमात प्रत्येक भागातील पाच कर्तत्ववान महिलांचा गौरव केला जाणार असल्याची माहितीही सातपुते यांनी दिली. या कार्यक्रमातून बेटी बचाओ, बेटी पढाओ अभियानाच्या माहितीसह लता मंगेशकर यांच्याविषयी माहिती नसणार्या अनेक पैलूंचीही माहिती दिली जाणार असून, हर मॅजेस्टी असे या कार्यक्रमाचे नाव असेल असेही त्यांनी सांगितले. या कार्यक्रमास पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा, प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महिला व बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे, बेटी बचाओ, बेटी पढाओ अभियानाचे पालक खासदार डॉ. विनय सहस्त्रबुद्धे, राष्ट्रीय संयोजक डॉ. राजेंद्र फडके यांनीही शुभेच्छा दिल्याचे ते म्हणाले.
विवाह नोंदणीच्यावेळीस गर्भलिंग निदान न करण्याची शपथ
बेटी बचाओ, बेटी पढाओ अभियानाच्यावतीने राज्य सरकारकडे काही मागण्या नोंदविण्यात आलेल्या आहेत. त्यात विवाह नोंदणी करतानाच नवदाम्पत्याकडून आपण गर्भलिंग निदान करणार नाही, असे शपथपत्र घेण्यात यावे, चॅरिटेबल हॉस्पिटल्सच्या रुग्णालयात महिलेने मुलीस जन्म दिला तर संबंधितांना बिलात सवलत देण्यात यावी, लिंगनिदान चाचणीबंदी कायद्याची काटेकोरपणे अमलबजावणी व्हावी आदींसह अनेक मागण्या सरकारकडे करण्यात आलेल्या आहेत. त्या मागण्यांबाबत सरकार सकारात्मक असून, लवकरच त्याची अमलबजावणी सुरु होईल, अशी आशा आहे. या शिवाय, राज्यभरातील कीर्तनकारांना आपल्या कीर्तनातून बेटी पढाओ, बेटी बचाओ या मुद्द्यावर पाच मिनिटे तरी प्रबोधन करावे, असे आवाहन करण्यात आलेले आहे. तसेच, मुलगा-मुलगी समान मानून हुंड्याचा आग्रह सोडण्याबाबत राज्यभरात जनजागृती केली जात असल्याचेही श्याम सातपुते यांनी ‘जनशक्ति’शी बोलताना सांगितले.
मिसाळवाडी गावाचे राज्यात सर्वाधिक लिंग गुणवोत्तर
बुलडाणा जिल्ह्यातील चिखली तालुक्यातील मिसाळवाडी गावाचे लिंग गुणवोत्तर हे राज्यात सर्वाधिक असल्याची बाब 2011च्या जनगणनेतून उघडकीस आली आहे. या गावास आपण लवकरच भेट देणार असून, गावाचा राज्य पातळीवर सन्मान करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व महिला, बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे यांना साकडे घालणार असल्याचेही श्याम सातपुते यांनी सांगितले. या जनगणनेनुसार राज्याचे लिंग गुणवोत्तर हे 929 इतके असताना मिसाळवाडीसारख्या एका छोट्या खेड्याचे लिंग गुणवोत्तर हे 971 इतके आहे. वारकरी सांप्रदायिक असलेल्या या गावात मुलीच्या जन्माचे उत्साहाने स्वागत करण्यात येते.