मुंबई : 2 मे 2012 नंतर मान्यता मिळालेल्या राज्यातील 2500 माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षकांच्या सेवा सोमवारपासून समाप्त करण्यात आल्या आहेत. त्या त्या जिल्ह्यातील शिक्षणाधिकारी यांनी सेवा समाप्तीच्या नोटीसा बजावल्या आहेत. यात मुंबईतील 276 शिक्षकांचा समावेश असल्याचे समजते. शासनाचा हा निर्णय धक्कादायक असून त्याविरोधात संघटीतपणे दाद मागण्याचा निर्णय शिक्षक भारतीने घेतल्याचे संघटनेचे प्रमुख कार्यवाह जालिंदर सरोदे यांनी म्हटले आहे.
शासनाने अलिकडेच 2005 नंतरच्या नेमणुकांनाही नोटीसा बजावण्याचे आदेश दिले आहेत. महाराष्ट्रात हा आकडा 50,000 हून अधिक जाण्याची शक्यता आहे. येत्या विधिमंडळ अधिवेशनात आमदार कपिल पाटील या प्रश्नाचा जाब सरकारला विचारणार आहेत. शिक्षक भारतीने या सर्व बाधीत शिक्षकांच्या संदर्भात येत्या गुरुवारी शिक्षण उपसंचालक कार्यालयावर निदर्शने आयोजित केली आहेत, अशी माहिती शिक्षक भारतीचे मुंबईचे अध्यक्ष शशिकांत उतेकर यांनी दिली.
राज्यात प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षकांची 1 लाखाहून अधिक पदे रिक्त आहेत. तर आणखी 50 हजार शिक्षकांना घरी पाठवण्याची शिक्षण विभागाने तयारी केली आहे. हे भयंकर आहे. सरकारचे हे षढयंत्र यशस्वी होऊ दिले जाणार नाही.
-आमदार कपिल पाटील