मुंबई: लोकसभा निवडणुकीच्या निकालाला काही दिवस शिल्लक आहे. प्रत्येक पक्ष आपापल्या परीने सांगत आहे की, आमच्या पक्षाला इतक्या जागा मिळतील. त्यात आता राज्यातील भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी राज्यातील निवडणुकीबाबत भाकीत वर्तवले आहे. राज्यात आम्हाला ४० ते ४५ जागा मिळतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.
एक्झिट पोल मध्ये भाजपाला पूर्ण बहुमत मिळत असल्याचे चित्र आहे. देशातील जनतेने पुन्हा एकदा मोदींवर विश्वास ठेवल्याबद्दल त्यांनी आभार व्यक्त केले. भाजपाला २०१९च्या लोकसभा निवडणुकीत पूर्ण बहुमत मिळत असून, यावेळी भाजप ३००चा टप्पा पार करेल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला . ते मुंबईत पत्रकारांसोबत बोलत होते.
जे चित्र लोकसभा निवडणुकीत दिसेल तेच चित्र पुन्हा एकदा विधानसभेला राहील असेही ते यावेळी म्हणाले. राज्याच्या निवडणुकीत छोटा भाऊ, मोठा भाऊ अस काही नसून, लोकसभा निवडणुकीत राज्यातील ४८ जागांवर मोदीच उभे होते म्हणून आम्हाला लोकांनी चांगला प्रतिसाद दिला आहे. या निवडणुकीत आमची मने जुळली असून पुन्हा असेच चित्र विधानसभेला पाहण्यास मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.