राज्यात करोनाचा कहर कायम; रुग्णसंख्या दहा हजाराच्या जवळ

0

मुंबई – देशव्यापी लॉकडाउनचा आज ३७ वा दिवस आहे. देशात करोनाच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशात करोना व्हायरसबाधित रुग्णांची संख्या ३३ हजार ०५० वर पोहचली आहे. यात १,०७४ जणांचा मृत्यू झाला आहे. महाराष्ट्रातही करोनाचा कहर कायम आहे. राज्यात आज करोनाचे ५९७ नवीन रुग्ण आढळले असून एकूण रुग्णसंख्या दहा हजाराच्या जवळ पोहचली आहे. यापैकी ४३२ जणांचा मृत्यू झाला आहे.

राज्यात आज करोनाच्या ५९७ नवीन रुग्णांची भर पडल्याने एकूण रुग्णसंख्या ९ हजार ९१५ झाली आहे. दिलासा देणारी बाब म्हणजे रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही वाढत असून आज एकाच दिवसात २०५ रुग्णांनी करोनावर मात केली आहे. आतापर्यंत १ हजार ५९३ रुग्णांनी करोनाला हरवण्यात यश मिळवले आहे. मुंबईतील करोना मृत्यूदर सर्वाधिक आहे. राज्यात आज एकूण ३२ रुग्णांचा मृत्यू झाला त्यात मुंबईतील २६ रुग्णांचा समावेश आहे. पुण्यात तीन तर सोलापूर, औरंगाबाद आणि पनवेलमध्ये प्रत्येकी एका रुग्णाचा करोनाने मृत्यू झाला. एकूण मृतांपैकी २५ पुरुष आहेत तर ७ महिला आहेत. त्यात ६० वर्षे किंवा त्यावरील १७ रुग्ण तर १५ रुग्ण ४० ते ५९ वयोगटातील आहेत. ३२ पैकी १८ रुग्णांमध्ये मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग अशा स्वरूपाचे अतिजोखमीचे आजार होते.