राज्यात कोंबडीपालन प्रकल्प राबवणार

0

मुंबई। कुक्कुटपालनाला चालना देण्याबरोबरच शेतकर्‍यांना पुरक रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी तसेच सुधारित देशी ब्रीडच्या कोंबडी पालनाला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने राज्यात 302 तालुक्यांत कोंबडीपालन प्रकल्प राबवण्याचा निर्णय राज्य सरकारला घेतला आहे. या प्रकल्पामुळे अडीच लाख थेट तर दहा लाख अप्रत्यक्ष रोजगार उपलब्ध होणार आहे, अशी माहिती कृषी विभागातील एका उच्चपदस्थ अधिकार्‍याने दिली.

राज्यात कोंबड्यांची संख्या 7 कोटी 78 लाख असून, ती देशातल्या एकूण कोंबड्यांच्या संख्येच्या तुलनेत 10.7 टक्के आहे. देशपातळीवर राज्याचा तिसरा क्रमांक आहे. अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी यंदाच्या अर्थसंकल्पात या प्रकल्पाची घोषणा केली होती. त्यानुसार शेतकर्‍यांना सरकारी दरानुसार अंड्यांची विक्री करण्यात येणार आहे. या अंड्यांच्या माध्यमातून देशी कोंबड्यांचे उत्पादन शेतकरी घेऊ शकतील असे कृषी विभागाच्या एका उच्चपदस्थ अधिकार्‍याने सांगितले. कोंबडी पालन प्रकल्प उभारण्यासाठी 10 लाख 27 हजार रुपये खर्च अपेक्षित असून त्यासाठी राज्य सरकारकडून अनुसूचित जाती जमातींना 75 टक्के तर खुल्या वर्गासाठी 50 टक्के अनुदान देण्यात येणार आहे. कुक्कुटपालन प्रकल्प उभारण्यासाठी या क्षेत्रातील तज्ज्ञांना प्राधान्य देतानाच त्याच्याकडे स्वत:ची जागा आणि शेड असणे गरजेचे असेल असेही या अधिकार्‍याने स्पष्ट केले. कुपाषणाच्या समस्येवर मात करण्यासाठी आदिवासी भागातही कक्कुटपालनासाठी प्रोत्साहन दिले जाणार आहे. तसेच राज्यातल्या अंगणवाड्यांना देखील या अंड्यांचा पुरवठा करण्याचा विचार शासनस्तरावर सुरू आहे.