राज्यात कोळी महासंघ देणार महिलांना रोजगार

0

मुरबाड । राज्यात कोळी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष रमेश पाटील यांच्या नेतृत्वाखाली राज्यात 30 जिल्ह्यांमध्ये महिला सक्षमीकरण केंद्र, रुग्णवाहिका वाटप व इंग्रजी शाळा सुरु करण्यात येणार असल्याची माहिती मुरबाड येथे भिवंडी-कल्याण परिसर कोळी संघाचे अध्यक्ष अशोक मिरकुटे यांनी दिली आहे. पापड, लोणचे, खाद्य तेल तयार करणे तसेच शिवणकाम अशा उद्योगातून राज्यातील 3000 महिलांना तात्काळ रोजगार उपलब्ध करून दिला जाणार आहे. अशाप्रकारे राज्यात सर्वत्र महिला सक्षमीकरण सुरु झाले असून मुरबाड, कल्याणमध्ये काही महिलांना रोजगार उपलब्ध करून देण्यात आला आहे.

सक्षमीकरण केंद्रे उभारणार
कल्याण तालुक्यात लवकरात लवकर कोळी समाज निवास, भिवंडी परिसर कोळी समाज निवास, मुरबाड तालुक्यात कोळी समाज निवास सोसायटी अशा प्रकारची कामे करण्यात येणार आहेत. ठाणे जिल्ह्यात कोळी समाज मोठ्या प्रमाणात राहत आहे. त्या त्या ठिकाणी महिला सक्षमीकरण केंद्रे उभारण्यात येणार आहे.

10 रुग्णवाहिकांचे वाटप
कोळी महासंघ 30 जिल्ह्यांत 30 रुग्णवाहिका वाटप करणार असून त्यात 10 रुग्णवाहिकांचे वाटप करण्यात आले आहे. कोळी समाज हा इंग्रजी शिक्षणापासून वंचित राहू नये म्हणून इंग्रजी माध्यमाच्या शाळा सुरु करण्याचे ध्येय कोळी महासंघाने ठेवले आहे. या संपूर्ण कार्यामध्ये कोळी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष रमेश पाटील, युवा अध्यक्ष चेतन पाटील, उपनेते देवेंद्र भोईर, कर्मचारी आघाडी राज्य सचिव सुभाष कोळी, कल्याण जिल्हा अध्यक्ष सचिन देशेकर, भिवंडी तालुका अध्यक्ष अशोक मिरकुटे, महिला अध्यक्ष उपेक्षा भोईर, कल्याण तालुका कार्याध्यक्ष भीमसेन पाटील या सर्वानी सर्वोतोपरी प्रयत्न केले आहेत.