राज्यात टँकरबाबत सरकारी आकड्यांचा गोलमाल!

0

मुंबई (निलेश झालटे) : राज्यसरकार राज्यात पाणीटंचाई नसल्याचा दावा करत आहे मात्र अनेक ठिकाणी अजूनही टँकरची मोठ्या प्रमाणावर आवश्यकता असल्याचे समोर आले आहे. याबाबत भाजपचे ज्येष्ठ नेते तथा माजी मंत्री आ. एकनाथराव खडसे यांनी सरकारलाच धारेवर धरले आहे. आपल्या मुक्ताईनगर मतदारसंघातील 80 गावांना 80 टँकर लवकरात लवकर द्यावे अन्यथा उपोषणाला बसू असा इशाराच एकनाथराव खडसे यांनी दिला होता. विशेष म्हणजे जलसंपदा मंत्री हे जिल्ह्यातील असून देखील या समस्येकडे दुर्लक्ष असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. राज्यात पावसाळा सुरू झाला असला तरी अनेक भागात पाणीटंचाई कायम असून जलयुक्त शिवार तसेच पाणीपुरवठ्याच्या योजनांचे अपयश लपविण्यासाठी राज्यात टँकरची संख्या कमी दाखविली जात असल्याचा आरोप विरोधी पक्षनेत्यांनी केला आहे.

नाथाभाऊंचा दणका!
विविध आरोपांनी घेरलेले नाथाभाऊ सध्या मंत्रिमंडळातून बाहेर आहेत. काही आरोपांतून त्यांना क्लिनचिट मिळाली असून अद्याप जमीन गैरव्यवहाराच्या प्रकरणाची चौकशी समिती करत आहे. नाथाभाऊ सत्तेत असले तरी आपल्या मतदारसंघातील समस्यांसाठी ते नेहमीच तत्पर असलेले दिसून आले आहेत. त्यांनी वेळोवेळी आपल्या सरकारला देखील धारेवर धरले आहे. 80 टँकरची मागणी करत त्यांनी उपोषणाचा इशारा देताच प्रशासन खडबडून जागे झाले असून 2 दिवसात संबंधित गावांना पाणीपुरवठा सुरू होणार असल्याची माहिती मिळाली आहे.

टँकरबाबत सरकारी आकडे चुकीचे!
राज्यात यावर्षी जलयुक्त शिवारची कामे मोठ्या प्रमाणात झाली असल्याचा सरकारचा दावा असून टँकरचे प्रमाण अत्यंत कमी असल्याचे सांगितले जात आहे. मात्र एकट्या मुक्ताईनगरात ज्येष्ठ नेते खडसे जर 80 टँकरची मागणी करत असतील तर राज्यात देखील स्थिती निश्चितच वेगळी नसणार आहे. जलयुक्त शिवाराचे अपयश आणि त्यातील भ्रष्टाचार लपवण्यासाठी टँकरची संख्या कमी केली जात आहे, गावाच्या गावे पाण्यापासून वंचित ठेवली जात आहेत, असा आरोप विरोधी पक्षनेते धंनजय मुंडे यांनी केला आहे.

सदर गावांतील पाण्याच्या समस्यांविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांच्याशी चर्चा केली. या चर्चेनंतर आज, रविवारपासूनच या गावांना पाणीपुरवठा सुरू केलेला आहे. बिल स्थगित असल्यामुळे पाणीपुरवठा स्थगित होता. याची पूर्तता करून येत्या दोन दिवसात सर्व गावांचा पाणीपुरवठा सुरळीत होणार आहे.
आ. एकनाथराव खडसे