राज्यात ठिकठिकाणी रास्ता रोको

0

पुणे : कर्जमाफी, शेतमालाला हमीभाव आदीसह विविध मागण्यांसाठी शेतकरी सुकाणू समितीने सोमवारी राज्यात ठिकठिकाणी रास्ता रोको आंदोलन केले. परभणी, अहमदनगर जिल्ह्यातील पुणतांबा आणि राहूरी, नाशिक जिल्ह्यात सटाण्यात तसेच नाशिक-पुणे महामार्गावरील शिंदे पलसे येथे शेतकर्‍यांनी रास्तारोको आंदोलन केले. यावेळी सरकारविरोधी घोषणाबाजीही करण्यात आली.

महामार्गावर वाहतूक कोंडी
घाटंजीतील यवतमाळ नाक्यावर शेतकर्‍यांनी सुमारे अडीच ते तीन तास वाहतूक अडवून धरली होती. सरकारचा नाकर्तेपणा व उदासीन धोरणाबाबत शेतकर्‍यांनी निषेध नोंदविला. धुळे जिल्ह्यातील सुरत-नागपूर महामार्गावरील दहीवेल तसेच धुळे-औरंगाबाद महामार्गावरील गरताड येथे सत्यशोधक शेतकरी संघटनेने चक्काजाम आंदोलन केले. दोन तास चाललेल्या या आंदोलनामुळे दोन्ही ठिकाणी महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी झाली होती. यानंतर प्रशासकीय अधिकार्‍यांना मागण्यांचे निवेदन देऊन आंदोलन मागे घेण्यात आले.

पुणे-सातारा महामार्ग रोखला
सातार्‍यात सुकाणू समितीच्या शेतकर्‍यांनी रास्ता रोको केला. तर पुण्यात शेतकरी आणि कामगार संघटनांनी पुणे-सातारा महामार्ग रोखला होता. पुणे-सातारा महामार्गावर पोलिसांनी काही शेतकर्‍यांना ताब्यात घेतले. तर कराडमध्येही स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 4 रोखल्याने वाहतूक ठप्प झाली होती. नंदुरबारसह जळगावातही बांभोरी पुलाजवळ शेतकर्‍यांनी रास्ता रोको आंदोलन केले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकर्‍यांना जाहीर केलेली 34 हजार कोटींची कर्जमाफी म्हणजे, निव्वळ नवरा बायकोमध्ये भांडण लावणारी आहे. कर्जमाफी तर झाली, पण ती कुणाच्या हाती लागलेली नाही. विधानपरिषद निवडणुकीत सुद्धा भाजप आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विश्वासघात केला आहे. मागण्या पूर्ण न झाल्यास सत्तेतून बाहेर पडू.
-राजू शेट्टी, खासदार