पुणे । राज्यात डेंग्यूने आजारी पडलेल्या रुग्णांची संख्या 4,797 झाली असून आतापर्यंत 21 रुग्णांचा बळी या तापाने घेतला आहे. चिकुनगुन्याच्या रुग्णांची संख्याही 820 वर पोहोचली आहे. दुसरीकडे पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने केलेल्या सर्वेक्षणात 15 ते 44 वयोगटातील महिला डेंग्यूला बळी पडत असल्याचे आढळून आले आहे. महापालिकेने 307 रुग्णांची पाहणी करून हा निष्कर्ष काढला आहे. डासांमुळे होणार्या या दोन्ही रोगांमुळे राज्यभर साथीच्या रोगाने थैमान घातले आहे.
खासगी रुग्णालयांत नोंद करण्यास हेळसांड
नोंद झालेल्या डेंग्यू रुग्णांपेक्षा प्रत्यक्षातल्या रुग्णांची संख्या जास्त असण्याची चिन्हे आहेत. या सर्व रुग्णांची नोंद करुन प्रभावी उपचार करण्याबाबतचे पत्र राज्य कीटक नियंत्रण विभागाने इंडियन मेडिकल असोसिएशन, इंडियन अॅकॅडमी ऑफ पेडियाट्रिक्स, फेडरेशन ऑफ ओबेस्ट्रिक अँड गायनॉकॉलॉजिकल सोसायटी ऑफ इंडिया आणि इतर वैद्यकीय संघटनांना पाठवले आहे. मात्र खासगी रुग्णालयांकडून रुग्णांची नोंद करण्यात हेळसांड केली जात आहे. त्यामुळे वेळप्रसंगी अशा डॉक्टर व रुग्णालयांविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्याचाही इशारा देण्यात आला आहे. आरोग्य खात्याचे राज्य सर्वेक्षण अधिकारी डॉ. प्रदीप आवटे यांनी सांगितले की, डेंग्यू, चिकुनगुन्या या डासांमुळे होणार्या आजारांचा प्रकोप अलीकडच्या काही वर्षांत वाढलेला आहे. यापैकी डेंग्यू हा विषाणूजन्य आजार असल्याने त्यावर प्रभावी औषधोपचार उपलब्ध नाहीत.
5 ते 6 दिवसांत लक्षणे दिसतात
विषाणूग्रस्त डास चावल्यानंतर 5 ते 6 दिवसांत लक्षणे दिसतात. अचानक चढणारा ताप, असह्य अंगदुखी, सांधेदुखी डोकेदुखी सुरू होते. भूक न लागणे, मळमळ, पोटदुखी हा त्रास होऊ शकतो. क्वचित त्वचेवर पुरळ उठतात. रक्तस्रावित डेंग्यू जास्त गंभीर असतो. यात नाक, हिरड्या, गुद्द्वारातून रक्तस्राव ही लक्षणे आढळतात. अशी लक्षणे दिसू लागल्यानंतर घरगुती उपचार किंवा औषधे न घेता तातडीने रक्त तपासणी करावी. यातून संसर्ग झाल्याचे स्पष्ट होऊन पुढील उपचार घेता येतील. अन्यथा डेंग्यू जीवघेणा ठरू शकतो, अशी माहिती वैद्यकीय तज्ज्ञांनी दिली.
डेंग्यूस कारणीभूत ठरणारा एडिस डास हा दिवसाच चावतो. त्यामुळे कामाच्या ठिकाणी, शाळा-कॉलेजांमध्ये काळजी घेतली पाहिजे. प्लास्टिक बाटल्या, टायर, करवंट्या, फुटक्या वस्तू आदींमध्ये साठलेल्या दहा-पंधरा मिलिमीटर पाण्यातसुद्धा एडिस डास अंडी घालतो व त्यातून त्याची उत्पत्ती होते. त्यामुळे अशी ठिकाणे नष्ट केली पाहिजेत, असे राज्य आरोग्य विभागाचे डॉ. प्रदीप आवटे यांनी सांगितले आहे.
307 रुग्णांची पाहणी
दरम्यान, पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने केलेल्या सर्वेक्षणात 15 ते 44 वयोगटातील महिला डेंग्यूला बळी पडत असल्याचे आढळून आले आहे. महापालिकेने 307 रुग्णांची पाहणी करून हा निष्कर्ष काढला. या वयोगटातल्या स्त्रिया शिक्षण, नोकरी, व्यवसाय आदींच्या निमित्ताने अनेक ठिकाणी फिरत असतात. शहराच्या वेगवेगळ्या भागांशी संपर्कात आल्याने त्यांना या आजाराची लागण होते, अशी माहिती आरोग्य अधिकार्यांनी दिली.