राज्यात नवीन कारखाने नकोत!

0

शरद पवारांचा राज्यातील भाजप सरकारला सल्ला

पुणे : साखर कारखानदारीमध्ये महाराष्ट्र क्रमांक एकवर होते. हा दर्जा आता घसरला आहे. देशात साखर कारखानदारीत उत्तरप्रदेश हे राज्य क्रमांक एकवर पोहोचले आहे. राज्यात घटलेले उसाचे उत्पादन, कमी ऊसगाळप, कमी साखर उतारा या बाबी पाहाता साखर उत्पादनात मोठी घट झाली आहे. दुसरीकडे, साखर कारखान्यांवर कर्जाचा बोजाही भरमसाठ वाढलेला आहे. तसेच, कर्मचारीवर्गाच्या पगाराचा बोजाही आहे. त्यामुळे सर्व साखर कारखान्यांनी ऊसविकास कार्यक्रम प्रभावीपणे राबवावा. तसेच, राज्यातील ऊसाची अडचण पाहाता आणखी साखर कारखाने काढण्यास परवानगी देऊ नये, असा सल्ला राज्यातील भाजप सरकारला माजी केंद्रीय कृषिमंत्री तथा ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी दिला. मांजरी येथील वसंतदादा शुगर इन्सिट्यूटमध्ये आयोजित ऊसविकास कृती कार्यक्रमातील एकदिवशीय चर्चासत्रात पवार बोलत होते. याप्रसंगी सहकारी साखर कारखानाक्षेत्रातील विविध मान्यवरांची प्रामुख्याने उपस्थिती होती.

ऊसविकासाचा कार्यक्रम हाती घ्यावा लागेल!
शरद पवार म्हणाले, देशात महाराष्ट्र आणि तामिळनाडू हे ऊस उत्पादन, साखर उत्पादन, साखर उतार्‍यात आघाडीवर होते. आता उत्तरप्रदेश प्रथम क्रमांक मिळविला आहे. त्यामुळे आपली खरी स्पर्धा यापुढे उत्तरप्रदेशाशी आहे. साडेनऊ टक्क्यांच्या उतार्‍यास टनाला 2 हजार 500 रुपये पश्चिम महाराष्ट्रातील कारखान्यांशिवाय राज्यात कोणी भाव देऊ शकणार नाही. त्यामुळे ऊस विकासाचा कार्यक्रम हाती घेतल्याशिवाय आपणांस पर्याय नाही. त्यामुळे राज्यातील कारखाना दरएकरी ऊस उत्पादन वाढविणे, उतारा वाढविणे आणि किमान पाच ते सहा महिने ऊस गाळप हंगाम चालविणे आवश्यक आहे. त्याची रचना, उभारणी आणि आवश्यक तयारी करावी लागेल. याप्रमाणे आढावा घेत 4 ते 5 वर्षात साखर उतारा व ऊस क्षेत्रवाढ केल्यास आपण निश्चितच उत्तरप्रदेशच्या पुढे जाऊ, असा विश्वासही पवार यांनी व्यक्त केला. प्रतिहेक्टरी ऊस उत्पादन वाढविण्यासाठी जैविक खतांचा वापर आणि माती परीक्षण केंद्राची उभारणी करणे. अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारीत शाश्वत ऊस उत्पादन केल्यास कारखानदारी टिकू शकेल, असेही ते म्हणाले.

नवीन परवान्यांबद्दल चिंता व्यक्त
या एकदिवशीय चर्चासत्राचे दीपप्रज्वलनाने शरद पवार यांच्याहस्ते उद्घाटन झाले. राज्यातील घटलेला साखर उतारा, ऊसउत्पादन आणि नवीन कारखाने काढण्यासाठी राज्य सरकार देत असलेले परवाने याबद्दल पवारांनी आपल्या भाषणात चिंता व्यक्त केली. याप्रसंगी वसंतदादा शुगर इन्सिट्यूटचे उपाध्यक्ष दिलीप वळसे पाटील, ज्येष्ठ नेते शंकरराव कोल्हे, विजयसिंह मोहिते पाटील, अजित पवार, जयंत पाटील, जयप्रकाश दांडेकरगांवकर, राजेश टोपे, हर्षवर्धन पाटील, इंद्रजित मोहिते, विदुरा नवले, कल्लाप्पाण्णा आवाडे, व्हीएसआयचे महासंचालक शिवाजीराव देशमुख, राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना संघाचे व्यवस्थापकीय संचालक प्रकाश नाईकनवरे आदींसह कारखान्यांचे अध्यक्ष, कृषी अधिकारी उपस्थित होते. यावेळी वळसे पाटील यांनी प्रास्ताविक केले. कृषिक्षेत्रातील संशोधकांनी विविध विषयांवर सादरीकरण केले.

ऊस असो की नसो आमच्या आमदारांना कारखाना लागतो
आमच्या काही नेेते आणि आमदारांकडून ऊस उत्पादन नसतानादेखील साखर कारखाने काढली जातात. माणसे सांभाळण्यासाठी आम्हीदेखील त्याला मदत करतो. काही जणांना कारखाना काढू नका असा सल्ला देऊनदेखील कोणी ऐकत नाही. मग आम्ही म्हणतो कारखाने काढा, पण पुढील समस्यांना तोंड द्या. बेसुमार कारखाने काढल्यांमुळेे आजचे हे दिवस आलेत, असे सूचक विधान शरद पवार यांनी यावेळी केले. यावेळी उपस्थितांमध्ये हास्यकल्लोळ रंगला.