मुंबई: राज्यातील भूमिपुत्रांना रोजगाराची संधी उपलब्ध व्हावी यासाठी आणि उद्योजक आणि मनुष्यबळ यांच्यातील दरी कमी करण्याच्या दृष्टीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते एमआयडीसीच्या महाजॉब्स पोर्टलचे आज उद्घाटन करण्यात आले आहे. उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी यावेळी राज्यात नोकरीसाठी डोमिसाइल बंधनकारक असणार असल्याची घोषणा केली आहे. यामुळे महाजॉबवर नोंदणीसाठी डोमिसाइल आवश्यक असणार आहे.
“डोमिसाइल बंधनकारक असल्याने आपोआप भूमिपुत्रांना संधी मिळणार आहे. कंपन्यांनी, उद्योगांनी याचा फायदा घेत स्थानिकांना नोकरी द्यावी. ज्यांच्याकडे कौशल्य नाही ते विकसित करण्यासाठी कौशल्य विकास विभागाला यामध्ये जोडून घेतले आहे,” अशी माहिती सुभाष देसाई यांनी दिली.
“रोजगारासाठी १७ अशी क्षेत्र निवडली आहेत ज्यामध्ये संधी मिळू शकते. ज्यामुळे ९५० हून अधिक व्यवसाय करु शकतात. बेरोजगारी संपवण्याची चांगली संधी आहे. महाराष्ट्रातील रोजगारी संपवण्यासोबत कौशल्य मनुष्यबळ निर्माण करण्यावर आपला भर असेल,” अशी माहिती सुभाष देसाई यांनी दिली आहे.