सिंचनासाठीची पाणी पट्टी वाढणार , मिनरल वॉटर, शितपेये आणि बिअरच्या पाणी दरात २५ पट वाढ
मुंबई: – पेट्रोल,डीझेलच्या वाढत्या दराचा फटका सहन करणाऱ्या नागरिकांना आता पाण्याच्या दरवाढीचा देखील सामना करावा लागणार आहे. राज्यातील घरगूती, औद्योगिक व कृषी क्षेत्रातील पाणी वापराच्या दरात वाढ करण्यात आली आहे. घरगुती, औद्योगिक आणि कृषी सिंचनासाठी वापरण्यात येणाऱ्या पाणी दरात १७ टक्के दरवाढ करण्यात आली आहे. औद्योगिक मध्येही दोन भाग करण्यात आले असून यामध्ये मिनरल वॉटर, शितपेये आणि बिअर कंपन्याना देण्यात येणाऱ्या पाण्यावर २५ पट दर आकारण्यात आला आहे. १००० लिटरला पूर्वी ४ रूपये ८० पैसे आकारण्यात येते होते तर वाढीव दरामध्ये १२० रूपये दर करण्यात आला आहे. महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाने मुंबईत पत्रकार परिषद घेऊन पाण्याच्या दरवाढीची घोषणा केली आहे. घरगूती आणि औद्योगिक पाणी वापराचे वाढीव दर हे १ फेब्रूवारी २०१८ पासून लागू होतील आणि शेतीच्या सिंचनासाठीचे वाढीव दर हे उन्हाळी हंगामापासून लागू करण्यात येणार असल्याची माहिती महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाचे अध्यक्ष के. पी. बक्षी यांनी दिली आहे.
महागाई निर्देशांकामध्ये टक्के वाढ झाल्यामुळे निर्णय
यापूर्वी प्राधिकरणाने ३० मे २०११ रोजीच्या आदेशान्वये पाणी पट्टी वाढ केली होती. मागील सात वर्षात महागाई निर्देशांकात ६३ टक्के वाढ झालेली आहे. ही वाढ लक्षात घेता पाणी पट्टी वाढ देखील करणे गरजेचे होते. त्यामुळेच १७ टक्के पाणी पट्टी वाढ करण्यात आली आहे. सद्या सिंचन व्यवस्थापनाचा खर्च पाणी पट्टी वसूलीपेक्षा जास्त होत आहे. तसेच प्रकल्पाच्या देखभाल दूरूस्तीस पुरेसा निधीही उपलब्ध होत नाही. तसेच महागाई देखील वाढली. महागाईच्या तूलनेत ही वाढ कमी असल्याचे के.पी.बक्षी यांनी सांगितले.
दरवाढ ही ठोक पाण्यासाठी
जलसंपत्ती प्राधिकरणाने केलेली दरवाढ ही ठोक पाण्यासाठी या दरवाढाची थेट परिणाम हा शेतीवर होणार आहे. घरगुती आणि औद्योगिक वापरासाठीच्या पाणी पट्टी वाढीचा दर हा त्या स्थानिक संस्थाना देण्यात येणाऱ्या ठोक पाण्यासाठी असणार आहे. त्यामुळे महानगरातील थेट पाणी वापर करणाऱ्या ग्राहकांचे दर वाढवायचे की नाही हा त्या त्या स्थानिक स्वराज्य संस्थाचा अधिकार असणार आहे. पाणी पट्टीत वाढ करत असतांना पाणी वापर संस्था तसेच ठिबक सिंचनचा वापर करणाऱ्या संस्थाना २५ टक्के सूट देण्यात आलेली आहे. पाणी वापर संस्थानी सूक्ष्म सिंचन केले तर वाढीव पाणी पट्टीच्या ५० टक्के सवलत देण्यात येणार आहे. वैयक्तीक शेतकऱ्यांसाठी पाण्याचा दर प्रति १००० लिटरसाठी रब्बीसाठी ४.५० पैसे,९.०० पैसे व १३.५० पैसे इतका राहणार आहे.