रत्नागिरी – यंदा मान्सूनचे आगमन प्रतिवर्षापेक्षा लवकर झाल्याने खरीपाच्या पेरण्यांची कामे जवळजवळ उरकण्याच्या मार्गावर आहेत. कोकणात सुमारे 80 टक्के पेरण्यांची कामे पूर्णत्वाकडे गेली आहेत. जमिनीची फोड करण्याच्या कामात बळीराजा गतीमान झाला आहे. पण पावसाने पुन्हा हुलकावणी देण्यास सुरुवात केल्याने दमदार पावसाच्या आगमनाने उल्हासित झालेल्या शेतकरी संभ्रमात पडला आहे.
यावर्षी मान्सूनने मे महिन्याच्या अखेरीस दमदार सलामी दिली. पावसाच्या दमदार सलामीने खरीपासाठी चांगली स्थिती निर्माण झाली. त्याचा लाभ घेऊन बळीराजा खरीपाच्या तयारीसाठी सज्ज झाला आणि जूनच्या प्रारंभाला पडलेल्या पावसाचा फायदा घेत लागोलाग पेरणीच्या कामांना प्रारंभ झाला. त्यापूर्वी कोकणात धूळपेरण्यांचीही कामे बळीराजाने उरकून घेतली होती. पण पावसाने अचानक लपंडाव सुरू केल्याने बळीराजा संभ्रमात पडला आहे. आता पुढे कसे जायचे याबाबत शेतकर्यांनी प्रश्न पडू लागला आहे.
खतासाठी कृषी विभागाची तजवीज
जिल्ह्यातील खरीपाच्या हंगामाला प्रारंभ होताना जिल्ह्यातील शेतकर्यांना बियाणी व खते यांचा वेळेत पुरवठा होण्यासाठी कृषी विभागाने तजवीज केली आहे. जिल्हयात एकूण 70 हजार हेक्टर इतके भात पिकाखालील शेतीचे क्षेत्र आहे. तसेच 12 हजार हेक्टर नागली व इतर पिकाखालील 2,500 हेक्टर इतके क्षेत्र असल्याचे सांगण्यात आले आहे. यावर्षी या क्षेत्रावर शेतीची लागवड करणार्या शेतकर्यांसाठी कृषी विभागाने 20 हजार मे. टन इतक्या खताची मागणी केली. त्या मागणीपेक्षा कृषी आयुक्त कार्यालयामार्फत 2 हजार मे.टन जादा खताचे आवंटन मंजूर झाले.
संकरीत बियांकडे शेतकर्यांचा कल
यावर्षी खतांच्या पुरवठ्यासाठी विशेष यंत्रणा राबवण्यात आली आहे. 1 जूनपासून जिल्ह्यात खतविक्रीला प्रारंभ झाला आहे. रत्नागिरी जिल्ह्यात किरकोळ व घाऊक मिळून सुमारे 400 खत विक्रेते आहेत. यावर्षी खरीपाच्या लागवडीसाठी 5 हजार क्विंटल इतक्या बियाण्यांची मागणी करण्यात आली होती. त्यापैकी 4 हजार 500 क्विंटल संकरित बियाण्याचे आवंटन प्राप्त झाले. अलिकडे शेतकर्यांची संकरित व सुधारीत बियाणे वापरण्याकडे कल वाढला आहे. रोग प्रतिबंधक औषधांचाही पुरवठा खरीपाच्या काळात केला जाणार असून, विविध प्रकाराच्या रोगांना व किटकांच्या हल्ल्यांपासून पिकांचे संरक्षण होण्यासाठी किटकनाशके, किडनाशके व बुरशीनाशकांचा पुरवठा केला जाणार आहे.