राज्यात पुढील दोन दिवस ‘कोसळधार’

मुंबई : अरबी समुद्रातून मोसमी पावसाला पोषक स्थिती निर्माण झाल्याने ८ जुलैपासून कोकण आणि विदर्भात काही ठिकाणी मोसमी पाऊस पुन्हा सक्रिय झाला आहे. १० जुलैपासून पाऊस राज्यात सर्वदूर जोर धरण्याची शक्यता व्यक्त केली जातेय. हवामान खात्याच्या इशाऱ्याप्रमाणेच आज सकाळपासूनच मुंबई, ठाण्यामध्ये पावसाला सुरुवात झाली आहे. पुण्यातही काही ठिकाणी पाऊस सुरु झालाय. भारतीय हवामान विभागाच्या पश्चिम विभागीय कार्यालयाचे उपमहासंचालक कृष्णानंद होसाळीकर यांनीही यासंदर्भातील माहिती ट्विटरवरुन दिलीय.

पावसाच्या दीर्घ विश्रांतीमुळे राज्याच्या बहुतांश भागातील पाणीसाठय़ांवर परिणाम दिसून येत आहे. पाऊस पुन्हा सक्रिय होणार असल्याचे संकेत हवामान विभागाने दिल्यामुळे काही प्रमाणात दिलासा व्यक्त केला जातो आहे. मुंबई, ठाण्यासह कोकण विभाग, पुणे, कोल्हापूर, साताऱ्यासह मध्य महाराष्ट्र, विदर्भातील नागूपर, वर्धा आणि मराठवाडय़ातील काही भागांत मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आला आहे.

९ जुलै : कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात काही ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस, काही भागांत विजांचा कडकडाट.

१० जुलै : मुंबई, ठाण्यात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गात तुरळक ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा. पुणे, कोल्हापूर, सातारा जिल्ह्य़ांत तुरळक भागात मुसळधार ते अतिवृष्टी.

११ जुलै : १० जुलैप्रमाणे मुंबई, ठाण्यासह कोकण विभाग, मध्य महाराष्ट्रातील संबंधित विभागांमध्ये काही ठिकाणी जोरदार पाऊस ते अतिवृष्टीची शक्यता. विदर्भातील नागपूर, वर्धा जिल्ह्य़ांत मुसळधार, तर मराठवाडय़ातही काही ठिकाणी पावसाचा जोर वाढणार.