ज्येष्ठ साहित्यिक डॉ. नागनाथ कोतापल्ले यांची खंत : पुणे जिल्हा ग्रंथोत्सव 2018
पुणे : आपण मराठी आहोत आणि आपली भाषिक संस्कृती किती महान आहे, याचे गोडवे आपण नेहमीच गात असतो. पण परदेशात पुस्तकाची एक आवृत्ती ही लाखभर प्रतींची असते, याउलट आपल्याकडे हजार प्रतींची एक आवृत्ती असते. दहा कोटीच्या महाराष्ट्रात एखाद्या पुस्तकाच्या हजार प्रती विकल्या जाताना दमछाक होते, ही लाजीरवाणी बाब आहे, अशी खंत ज्येष्ठ साहित्यिक डॉ. नागनाथ कोतापल्ले यांनी व्यक्त केली.
महाराष्ट्र राज्याचे ग्रंथालय संचालनालय आणि पुणे जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयातर्फे आयोजित दोन दिवसीय पुणे जिल्हा ग्रंथोत्सव 2018 चे उद्घाटन पुण्याचे प्रांताधिकारी रवींद्र गलांडे यांच्या हस्ते झाले, त्यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून डॉ. कोतापल्ले बोलत होते. जिल्हा ग्रंथालय अधिकारी श्रेया गोखले, दत्तात्रय क्षीरसागर, विकास टिंगरे, राजेंद्र सरग आदी मान्यवर याप्रसंगी उपस्थित होते. यानिमित्त सकाळी काढण्यात आलेल्या ग्रंथदिंडीचे उद्घाटन महापौर मुक्ता टिळक यांच्या हस्ते करण्यात आले.
संस्कृती समजून घेण्यासाठी वाचन महत्त्वाचे
ग्रंथांची केवळ पूजा करून चालणार नाही, तर माणूस, समाज, संस्कृती समजून घेण्यासाठी वाचन महत्त्वाचे आहे. संस्कृती समजून घेण्यासाठी वाचन आवश्यक असते. समाज माध्यमांमुळे वाचनाचे प्रमाण कमी होत आहे, असे म्हटले जाते. ही समाज माध्यमे वेगवान असली आणि त्याचा पाहिजे तसा वापर करण्याचे स्वातंत्र्य असले तरी त्याबद्दल विश्वासार्हता नसते. ती विश्वासार्हता ग्रंथांमध्ये असते, हा संदेश अशा ग्रंथोत्सवांच्या माध्यमातून जनमानसात रूजवला गेला पाहिजे, असे डॉ. नागनाथ कोतापल्ले यांनी सांगितले.
आत्मपरीक्षण करणे गरजेचे
या कार्यक्रमाच्या माध्यमातून लेखक आणि वाचक यांच्यात दुवा निर्माण करण्याचा प्रयत्न आहे. समाजाची प्रगती होण्यात ग्रंथांचे स्थान महत्त्वपूर्ण आहे. तंत्रज्ञानाच्या वापरामुळे वाचनाचे प्रमाण कमी होत असेल तर आपण आत्मपरीक्षण करणे गरजेचे आहे, असे प्रांताधिकारी रवींद्र गलांडे यांनी सांगितले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्रेया गोखले यांनी केले. तर मंगलपल्ली यांनी आभार मानले.