राज्यात प्रगत, डिजिटल शाळा झाल्या दुप्पट

0

मुंबई । प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गत आतापर्यंत 47 हजारहून अधिक शाळा प्रगत तर 63 हजारहून अधिक शाळा डिजिटल झाल्या असल्याचे महाराष्ट्राच्या आर्थिेक पाहणी अहवालात नमूद करण्यात आले आहे. विशेष म्हणजे प्रगत आणि डिजिटल शाळा होण्याचे प्रमाण हे जवळपास दुप्पट आहे. कार्य आधारीत शिक्षण देणार्‍या शाळा आणि आयएसओ प्रमाणित शाळांच्या संख्येतही गेल्या वर्षाच्या तुलनेत वाढ झाली आहे. शालेय मुलांच्या शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी सन 2015-16 मध्ये राज्य शासनाने प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रम सुरू केला.

आवश्यकतेनुसार प्रशिक्षण
एकही मूल शैक्षणिकदृष्ट्या अपेक्षेपेक्षा कमी असणार नाही यासाठी मुलांमधील मूलभूत क्षमता ओळखून प्रत्येक विद्यार्थ्याने वयोगटानुरुप अपेक्षित शैक्षणिक क्षमता प्राप्त केली आहे किंवा नाही याची पडताळणी करण्याकरिता प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमाअंतर्गत विशेष कृती आराखडा तयार करण्यात आला आहे. विद्यार्थ्यांमधील मूलभूत क्षमता आणि शैक्षणिक पातळी ओळखण्यासाठी राज्यस्तरीय अध्ययन संपादणूक सर्वेक्षणही घेण्यात आले. इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांच्या वर्षातून तीन शैक्षणिक प्रगती चाचण्या घेण्यात येतात ज्यामध्ये एक पायाभूत चाचणी आणि संकलित मूल्यमापनाच्या दोन चाचण्या असतात. विशेष म्हणजे प्रगत शैक्षणिक महाराष्ट्राचे ध्येय साध्य करण्यासाठी राज्य शासनाकडून शिक्षकांना आवश्यकतेनुसार आणि मागणीनुसार प्रशिक्षणही देण्यात येत आहे.

शिक्षणाच्या नवीन क्रांतीची सुरुवात
कोणत्याही प्रदेशाची ओळख ही त्याच्या संस्कृतीवरून निर्माण होते. महाराष्ट्राचा शैक्षणिक वारसा कायम पुढे राहावा, त्यामध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून राज्यातील शैक्षणिक सुविधा जागतिक दर्जाच्या व्हाव्यात, यासाठी राज्याच्या शिक्षण विभाग प्रयत्न करत आहे. प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रम म्हणजे शिक्षणाच्या नवीन क्रांतीची सुरुवात आहे. प्रत्येक मूल शिकले पाहिजे, या हेतूने शिक्षण संचालनालयामार्फत प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र उपक्रम राबवण्यात येत आहे.