राज्यात बेकायदेशीर नर्सिंग होम्सचा सुळसुळाट

0

मुंबई : कोणत्याही कायदेशीर तरतुदींचे पालन न करणार्‍या नर्सिंग होमचा राज्यात सुळसुळाट पसरला आहे. राज्यात अशा तब्बल 3 हजार 595 नर्सिंग होम बेकायदेशीरपणे सुरु असल्याचे आढळून आले आहेत. यामधील 68 नर्सिंग होममध्ये बोगस डॉक्टर आढळले आहेत. त्यामध्ये 15 बोगस डॉक्टर आढळले असून त्यांच्यावर एफआयआर दाखल करण्यात आल्याची माहिती आरोग्य मंत्री डॉ. दिपक सांवत यांनी तारांकीत प्रश्नाच्या लेखी उत्तरात दिली आहे. राज्यात बेकायदेशीररीत्या नर्सिंग होम सुरु असल्याबाबत विधान परिषदेत प्रश्न विचारण्यात आला.

साडेतीन हजार बेकायदेशीर नर्सिंग होम सुरू
या प्रश्नाला दिलेल्या लेखी उत्तरात आरोग्य मंत्री डॉ. दिपक सांवत यांनी माहिती दिली आहे. राज्यात 15 मार्च ते 28 एप्रिल 2017 दरम्यान नर्सिंग होमविरोधात विशेष तपासणी मोहिम राबविण्यात आली होती. या तपासणी दरम्यान अनेक ठिकाणी कायदेशीर तरतुदींचे कोणतेही पालन न करणारे बेकायदेशीर 3 हजार 595 नर्सिंग होम समोर सुरु असल्याचे समोर आले आहे. महाराष्ट्र मेडीकल कौन्सिल कायद्यातंर्गत आवश्यक नोंदणी नसलेली नर्सिंग होम, बोगस डॉक्टर, अपात्र कर्मचारी वर्ग असलेली अनेक नर्सिंग होम व खासगी रुग्णालये तपासणी मोहिमेत निदर्शनास आल्याची कबूली डॉ. सावंत यांनी दिली आहे.

नोंदणी असलेले केवळ 565 नर्सिंग होम
राज्यभरातील खासगी नर्सिंग होम व रुग्णालयांची तपासणी केली जाते का? आणि त्यांच्यावर काय कारवाई करण्यात येते? या विरोधकांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना दिपक सावंत यांनी पुढील माहिती दिली. राज्यभरात कायद्यातील विविध तरतुदींचे किंवा नियमांचे पालन न करणारे तीन हजार 795 नर्सिंग होम व रुग्णालये बेकायदा सुरू असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यात कायद्याप्रमाणे नोंदणी नसलेले 565 नर्सिंग होम आहेत. याशिवाय बोगस डॉक्टर, अपात्र कर्मचारी वर्ग, महाराष्ट्र मेडिकल कौन्सिल कायद्याचे उल्लंघन करणारी, विविध कायद्यांखालील नोंदणी नसलेली आणि त्याचबरोबर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, अग्निशमन दल, अन्न व औषध प्रशासन विभाग आदींची नोंदणी नसलेली अनेक नर्सिंग होम व रुग्णालये आढळली. या सर्वांवर कायदेशीर कारवाई करण्यात येत असल्याची माहिती दीपक सावंत यांनी दिली.

नीलम गोर्‍हेंचा संताप विधानपरिषद हडबडले
विधान परिषदेत नेवाळे प्रकरणावर अतिशय गंभीर चर्चा सुरु होती. त्यावेळी आमदार नीलम गोर्‍हे यांनी आपला मुद्दा मांडण्याचा प्रयत्न केला. मात्र भाई जगताप यांनी सभापतींना हा खूप गंभीर विषय असून यावर वायफळ चर्चा नको, अशी टिप्पणी केली. भाई जगताप यांच्या या वाक्याने नीलम गोर्‍हे यांचा पारा चांगलाच चढला. तुम्ही बोलता ते योग्य आणि आम्ही बोलतो ते वायफळ असे का, असा सवाल त्यांनी केला. आम्हाला जी माहिती मिळाली ती आम्ही मांडण्याचा प्रयत्न केला तर सत्ताधारी म्हणून आम्ही खाली बसतो, तुम्हीच बोला असे त्यांनी सुनावले. राजकारणात महिलांना अनेक स्तरावर संघर्ष करावा लागतो. त्यातला एक प्रकार आजही दिसला. सभापती माणिकराव ठाकरे यांनी सूचना केल्यावर भाई जगताप यांनी आपला विरोध मागे घेतला. यावर झाले असेल तर आता 5 मिनिटे गप्प बसा असा टोलाही त्यांनी भाई जगताप यांना लगावला.