राज्यात भविष्यात शिवसेनालाच संधी

0

पिंपरी-चिंचवड । शिवसेना हा महाराष्ट्राची अस्मिता जपणार लोकप्रेमी पक्ष असून भविष्यात शिवसेनेलाच मोठी संधी असणार आहे. कारण जोपर्यंत कट्टर शिवसैनिक पक्षात आहेत तोपर्यंत शिवसेनेचा गढ मजबूतच राहणार आहे, असा विश्‍वास राज्याचे ग्राम विकास व महसुल राज्यमंत्री, शिवसेनेचे नेते दादा भुसे यांनी ‘जनशक्ति’ प्रतिनिधीशी बोलताना व्यक्त केला. भोसरी इंद्रायणीमधील शिवसेनेच्या जनसंपर्क कार्यालयास मंगळवारी सदिच्छा भेट दिली. त्यावेळी प्रतिनिधीने संवाद साधला. यावेळी शिवसेनेचे निलेश मुटके, दत्तात्रय भालेराव, विश्वनाथ टेमगेरे, संदीप टोके, धनेज गांजवे, रामदास गाढवे, अशोक मोरे, अक्षय बांगर, विकास चासकर व शिवाजी पडवळ आदी शिवसैनिक उपस्थित होते.

विरोधी पक्षाचीही भूमिका
राज्यमंत्री भुसे म्हणाले, शिवसेना कधीही न संपणारा पक्ष आहे. तसेच तो कोणत्याही लाटेवर स्वार न होणारा पक्ष नाही. त्यामुळेच 2014 च्या विधानसभेच्या निवडणुकीत भाजपाची लाट असताना व शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या उनुपस्थित देखील 63 जागा लढवून आपले अस्तित्व दाखवून दिले. भाजपाला पूर्ण बहुमतापासून रोखले. हीच परिस्थिती पुढील लोकसभा व विधानसभेच्या निवडणुकीत देखील राहणार आहे. कारण राज्यातील जनतेने दोन्ही काँग्रेसची सरकारे पाहिली आहेत. तसेच त्यांच्यावरील विश्वास देखील आता जनतेचा राहिलेला नाही. तर शिवसेना सत्तेत असून देखील जनतेच्या हिताचा विचार करून विरोधी पक्षाची सुद्धा भूमिका बजावत आहे.

मराठी भाषिकांनी सेनेमागे खंबीर रहावे
शहरी भागातील शिवसेनेच्या परिस्थिती बाबत ते म्हणाले, शहरी भागात मराठी टक्का कमी होत असून अमराठी टक्का वाढत आहे. त्यामुळे शहरात शिवसेनेची थोडी पिछेहाट होताना दिसत आहे. याचे ताजे उदाहरण मिरा-भाईंदर निवडणुकीत सर्वांनाच पाहिला मिळाले. असे असले तरी तिथे शिवसेनेचे संख्याबळ पहिल्यापेक्षा नऊने वाढले आहे, हे नाकारून चालणार नाही, अशी परिस्थिती आता मुंबई व त्या जवळील शहराबरोबरच पुणे व पिंपरी-चिंचवडमध्ये देखील उद्भवू लागली आहे. त्यासाठी मराठी भाषिक जनतेने शिवसेनेच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहिले पाहिजे. जोपर्यत कट्टर शिवसैनिक शिवसेनेमध्ये आहे, तो पर्यत शिवसेनेचे अस्तित्व व गढ मजबुतच राहणार आहे.