राज्यात मान्सून लांबल्याने बळीराजा चिंतेत

0

मुंबई। पुढील चार दिवस राज्यात मान्सून रजेवर जाणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. 11 जुलैपर्यंत कोकण वगळता राज्यात पावसाचा जोर कमी राहणार आहे. अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण होत नसल्याने पावसाने दडी मारली आहे. पावसाचा जोर ओसरल्याने मात्र शेतकर्‍यांसमोर दुबार पेरणीचे संकट उभे राहिले आहे तसेच जुलैच्या 12 अथवा 13 तारखेपासून मान्सून पुन्हा सक्रिय होणार असल्याची शक्यताही हवामान खात्याने व्यक्त केलीये.

पावसासाठी प्रतिक्षाच
कोकणात तुरळक पाऊस पडणार असल्याचे हवामान खात्याकडून सांगण्यात आले आहे. तसेच 10 जुलैपर्यंत पावसाबाबत कोणतीही अंदाज वर्तवण्यात आलेला नाही.

मराठवाडा तहानलेलाच मराठवाड्यामध्ये पावसाने चांगल्या
सुरुवातीनंतर मोठी दडी मारली आहे. पावसाने दिलेली ही हुलकावणी पिकांवर परिणाम करणारी असून, दुबार पेरणीचे संकटही यामुळे ओढावण्याची शक्यता आहे. या पावसामुळे जलसाठ्यामध्ये चांगली वाढ होण्याबरोबरच पेरण्यांनाही वेग आला होता. बीडमध्ये 90 टक्के, लातूर जिल्ह्यामध्ये 80 टक्के, तर उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये 55 टक्के पेरण्या झाल्या आहेत. पेरण्या झाल्यामुळे शेतकर्‍यांमध्ये उत्साहाचे वातावरण होते. मात्र गेल्या दहा-बारा दिवसांमध्ये पाऊस पडलेला नाही. त्याचा परिणाम पिकांच्या वाढीवर झाला आहे. आता 10 जुलै रोजीच पावसाचे पुनरागमन होईल, असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे.

राज्यातील एकूण 18 टक्के क्षेत्रावर पेरण्या
राज्यात मान्सूनचे आगमन झाल्यानंतर अपेक्षित वाटचाली अभावी काही भागात पिकांच्या पेरणीचे वेळापत्रक कोलमडले आहे. राज्यात 1 ते 23 जूनपर्यंत सरासरीच्या 77 टक्के पाऊस झाल्याचे कृषी विभागाने कळवले आहे. मात्र सर्व भागात सारखा पाऊस नसल्याने आतापर्यंत राज्यात 18 टक्के क्षेत्रावर पेरणी झाली आहे. नागपूर विभागात सर्वाधिक कमी म्हणजे फक्त 4. 2 टक्के तर त्यानंतर पुणे विभागात पाच टक्के क्षेत्रावर पेरणी झाल्याचे कृषी विभागाने आपल्या 23 जूनच्या अहवालात स्पष्ट केले आहे. मराठवाड्यात तुलनेने चांगली स्थिती असून औरंगाबाद विभागात 45 टक्के तर लातूर विभागात सुमारे 15 टक्के पेरणी झाली आहे. कोल्हापूर विभागातही 14 टक्के पेरणी झाली आहे. नाशिक विभागातही पेरणीला वेग आलेला नसून तेथे 16 टक्केच पेरणी झाली आहे. अमरावती विभागात 22 टक्के पेरणी झाली आहे.

खरीप हंगामात कापूस व सोयाबीन ही मुख्ये पिके आहेत. सोयाबीनची 20 टक्के तर कापसाची 30 टक्के क्षेत्रावर पेरणी झाली आहे. खरीप कडधान्यामध्ये तूर 15, मुग 14, उडीद 11 तर इतर कडधान्यांची 2 टक्के पेरणी झाली आहे. एकूण खरीप कडधान्यांचा विचार करता 13 टक्के पेरणी झाली आहे.

कृषिमंत्री फुंडकरांकडे मदतीची मागणी
शेतकर्‍यांनी खरिपाची पेरणी पूर्ण केली. मात्र, त्यानंतर 25 दिवसांपासून पाऊस गायब झाला व शेतकर्‍यांवर दुबार पेरणीचे संकट उभे राहिले आहे. सध्या, शेतकर्‍यांमध्ये दुबार पेरणीची शक्ती राहिली नसून सरकारने तातडीने पंचनामे करून बियाणे व पेरणीचा खर्च द्यावा, अशी मागणी अन्नदाता शेतकरी संघटनेचे अध्यक्ष जयाजीराव सूर्यवंशी यांनी कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांच्याकडे केली आहे.

पावसाची सरासरी सारखी नाहीच
मराठवाड्यात पावसाने जून महिन्यात तब्बल 13 दिवस पाठ फिरवली. इथे महिन्याभरात केवळ 17 दिवस पावसांची नोंद झाली असून, यातील बहुतांश ठिकाणी केवळ रिमझिम पाऊस पडला. मराठवाड्यात जून महिन्यामध्येच वार्षिक सरासरीपेक्षा अधिक पावसाची टक्केवारी असली, तरी 76पैकी निम्म्या तालुक्यांमध्ये पावसाने सरासरीही गाठली नाही. गेल्या 15 दिवसांपैकी बहुतांश दिवस पावसाने मराठवाड्याकडे पाठ फिरवली आहे. आतापर्यंत वार्षिक सरासरीच्या तुलनेत मराठवाड्यात 174.50 मिलिमीटर (105 टक्के) पाऊस झाला आहे. गेल्यावर्षी समाधानकारक पाऊस पडला. जून महिन्यातील आकडेवारी पाहता जुलैमध्ये पाऊस पडेल की नाही, अशी शंका शेतकर्‍यांना आहे.