मुंबई : राज्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. कोरोना विषाणूचा बचाव करण्यासाठी हँड सॅनिटायझर आणि मास्कचा वापर करणे महत्वाचे असल्याचे आरोग्य खात्याकडून सांगण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर हँड सॅनिटायझर आणि मास्कचा अत्यावश्यक गोष्टींमध्ये समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे परिस्थितीचा गैरफायदा घेत कमी दर्जाचे सॅनिटायझरची विक्री तसेच त्याचा साठा करणाऱ्यांवर कडक कारवाई करणार असल्याचा इशारा अन्न व औषध प्रशासन मंत्री राजेंद्र शिंगणे यांनी आज दिला.
गेल्या काही दिवसात राज्यात 22 ठिकाणी या अंतर्गत कारवाइ करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. सोबतच सॅनिटायझरचा अतिवापर त्वचेसाठी हानिकारक असल्याचेही त्यांनी सांगितले. राज्यात हँड सॅनिटायझर आणि मास्कचा तुटवडा निर्माण झाल्याने इतर राज्यातून याची मागणी केल्याचंही मंत्री म्हणाले. राज्यात मोठ्या प्रमाणात हँड सॅनिटायझर आणि मास्कची खरेदी केली जात आहे. त्यामुळे बाजारात मास्क आणि सॅनिटायझरचा तुटवडा निर्माण झाला आहे.
राज्यात निर्माण झालेल्या परिस्थितीचा गैरफायदा घेत अनेकांनी हँड सॅनिटायझर आणि मास्कचा साठा करत बाजारात कृत्रिम तुटवडा निर्माण केला आहे. त्याविरोधात सरकार आता कडक कारवाई करणार असल्याचा इशारा राजेंद्र शिंगणे यांनी दिला आहे.