राज्यात यशस्वी झालेली महाविकास आघाडी जळगावात तोंडघशी

0

बहुमतासाठी जुळवाजुळव करतांनाच सदस्य फुटला

जळगाव :जिल्हा परीषदेच्या अध्यक्ष उपाध्यक्ष पदासाठी राज्यात यशस्वी झालेला महाविकास आघाडीचा प्रयोग जळगावात फसल्याने महाविकास आघाडीचे पदाधिकारी चांगलेच तोंडघशी पडले आहे. बहुमतासाठी जुळवाजुळव करतांना महाविकास आघाडीचाच एक सदस्य फुटल्याने जिल्हा परीषदेवर भाजपाची सत्ता कायम राहीली आहे.

गेल्या महिनाभरापासून जिल्हा परीषद अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदासाठी राजकीय मोर्चेबांधणी केली जात होती. पंधरा दिवसात या निवडणुकीसाठी हालचालींना वेग आला. राज्याप्रमाणे जळगावात देखिल महाविकास आघाडीचा प्रयोग करण्यासाठी शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांनी एकत्रित येण्याचा निर्णय घेतला. त्याप्रमाणे या तीनही पक्षाचे प्रमुख पदाधिकारी ना. गुलाबराव पाटील, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. रवींद्र पाटील, आ. अनिल भाईदास पाटील, संतोष चौधरी, काँग्रेसकडुन जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. संदीप पाटील, डी.जी.पाटील यांच्यात बैठका देखिल झाल्या. या बैठकांनंतर तीनही पक्षांनी आम्ही एक असल्याचा नारा दिला.

अध्यक्षपदासाठी सुरवातीला आमदार अनिल पाटील यांच्या पत्नी तथा जि.प.सदस्या जयश्री पाटील यांचे नाव जवळपास निश्चीत केले होते. मात्र ऐनवेळी महाविकास आघाडीने उमेदवार बदलवुन अध्यक्षपदासाठी जि.प. सदस्या रेखा राजपूत यांना उमेदवारी जाहीर केली. तर उपाध्यक्षपदासाठी जयश्री पाटील यांना उमेदवारी दिली. सदस्य फुटू नये म्हणून व्हीप म्हणजेच पक्षादेशही जारी केला. या सर्व हालचाली लक्षात घेता भाजपाचे ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे यांनी काही दिवसांपुर्वी जि.प. अध्यक्षांच्या निवासस्थानी सर्व सदस्यांची बैठक घेतली. या बैठकीनंतर खडसे यांनी काँग्रेसचे सदस्य आमच्यासोबत असल्याचा दावा केला होता. असाच दावा महाविकास आघाडीच्या नेत्यांनीही केला होता. त्यामुळे भाजपाचे सर्व सदस्य सहलीवर पाठविले होते. भाजपाकडुन आज निवडणुकीच्या दिवशी जि.प.सदस्या रंजना प्रल्हाद पाटील यांना अध्यक्षपदाचे तर लालचंद पाटील यांना उपाध्यक्षपदाचे उमेदवार जाहीर केले. दुपारी तीन वाजता जिल्हा परीषदेच्या सभागृहात अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदासाठी निवडणूक प्रक्रिया पार पडली. आवाजी मतदानाने ही प्रक्रिया घेण्यात आली. जिल्ह्याचे लक्ष लागलेल्या या निवडणुकीत महाविकास आघाडीचा एक सदस्य फुटल्याने जिल्हा परीषदेवर भाजपाची सत्ता कायम राहीली. त्यामुळे महाविकास आघाडीचा जळगाव प्रयोग फसला.