एकनाथ खडसेंचं होणार कमबॅक ?
मुंबई : राज्यामध्ये येत्या काही दिवसांत मंत्रिमंडळ विस्तार किंवा खातेबदलाची शक्यता वर्तवण्यात येत आहे. आरोग्यमंत्री दीपक सावंत यांची जुलै महिन्यातच विधान परिषद सदस्यत्वाची मुदत संपली असून त्याला आता सहा महिने होत आहेत. त्यामुळे दीपक सावंत यांच्या जागी नव्या मंत्र्याची नेमणूक करणे लवकरच अपेक्षित आहे. कृषी खात्याचा अतिरिक्त भार सध्या चंद्रकांत पाटील यांच्याकडे आहे. तो दुसऱ्या कोणाकडे दिला जाऊ शकतो. काही महामंडळाच्या नेमणुकाही होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
राज्यात मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून होत आहेत. राज्यातील भाजप-शिवसेना युती सरकारला चार वर्षे पूर्ण झाले आहेत. लोकसभा आणि राज्यसभा निवडणुका काही दिवसांवर असल्यामुळे हा शेवटचा मंत्रिमंडळ विस्तार असू शकतो. दुसरीकडे एकनाथ खडसे यांचं कमबॅक होणार असल्याच्या देखील चर्चा आहेत. तसेच भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांना देखील मंत्रीपद मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.