कल्याण : राज्यभरातील रस्त्यावरील खड्ड्यावरुन पाटील यांना लक्ष्य केले जात असताना त्यांनी पुन्हा एकदा येत्या दहा वर्षात राज्यातील एकाही रस्त्याला खड्डा नसेल, असे रस्ते तयार केले जातील असे वक्तव्य केले. गावात मंत्री येणार असले, की यंत्रणा कामाला लागते आणि रस्ते तयार केले जातात, अशी कबुलीही राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे. कल्याण-पडघा रोडवरील बापसई गावात सुरेश हावरे यांनी उभारलेल्या गृह प्रकल्पातील सदनिकाधारकांना चाव्या वाटप मंत्री पाटील यांच्या हस्ते दि.21आक्टोबर रोजी करण्यात आले आहे. त्या प्रसंगी ते बोलत होते.
राज्य सरकार, केंद्र सरकार आणि मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेच्या माध्यमातून शहरी, ग्रामीण आणि राज्य व राष्ट्रीय महामार्गाची विकास कामे केली जात आहे. 2022 पर्यंत रस्ते विकासाचे चित्र पूर्णपणे बदलेल असा विश्वास पाटील यांनी यावेळी व्यक्त केला आहे. रस्ते तयार करणाऱ्यांना कंत्राटदार कंपनीकडे त्याच्या दुरुस्ती देखभालीचे दायित्व दिले जाणार आहे. तीन ते पाच वर्षाचे दायित्व दिले जाईल. रस्ता विकसित केल्यावर तीन ते पाच वर्षात रस्त्यावर खड्डा पडला. रस्ता खराब झाला तर संबंधित कंपनीकडून त्यांची दुरुस्ती देखभाल करणे व बुजविण्याची जबाबदारी निश्चित केली जाणार आहे.असेही पाटील यांनी सांगितले.