नागपूर : काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने काल नागपुरात काढण्यात आलेल्या विराट मोर्चात दमदाटी बंद करा, अन्यथा सत्ता उलथावून लावू, असा खणखणीत इशारा माजी केंद्रीय मंत्री व ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी राज्यातील देवेंद्र फडणवीस सरकारला दिला असतानाच, गुरुवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी विधानसभेत बोलताना सरकारला सूचक संकेत दिले. त्यांच्या या वक्तव्याने राज्यात लवकरच राजकीय भूकंप होणार असल्याचे संकेत मिळत आहेत. भाजप सरकार शेतकरीप्रश्नांकडे दुर्लक्ष करत असून, त्यांच्याच पक्षातील आमदार नाराज आहेत. आगामी काळात आमच्याकडून तुमच्याकडे गेलेले आमदार परत आमच्याकडे येणार आहेत, असे प्रतिपादन पवार यांनी करून फडणवीस सरकारच्या पायाखालची वाळू सरकवली. विदर्भातील सिंचन घोटाळाप्रकरणी चार गुन्हे दाखल झाल्यानंतर राष्ट्रवादीचे नेतृत्व नरम पडेल, असे वाटत असतानाच पवारांनी विदर्भ, मराठवाड्यातील सिंचन व कृषीविषयक मुद्द्यावर सरकारला अक्षरशः धारेवर धरले. तसेच, सरकार पाडण्याची उघड उघड धमकीही दिली.
फक्त संघाच्या मुशीतील आमदारच भाजपात राहतील!
सरकारवर तोफ डागताना अजित पवार म्हणाले, ज्या प्रकारे विरोधक आमदार जसे शेतकर्यांचे प्रश्न सभागृहात मांडा, अशी मागणी आमच्याकडे करतात, तशीच मागणी सत्ताधारी आमदारही आमच्याकडे करत आहेत. भाजपचे खासदार नाना पटोले यांनी राजीनामा देवून सरकारने काय चूक केली ते दाखवून दिले आहे. त्यामुळे आणखी काही दिवस थांबा तुमच्या पक्षात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुशीत तयार झालेलेच राहणार असून, बाकीचे सर्व पुन्हा आपल्या मूळ घरी परतणार असल्याचे पवारांनी सांगत, नजीकच्या काळात राजकीय भूकंप होणार असल्याचे संकेत दिलेत. मुख्यमंत्र्यांसह अर्थमंत्री, वनमंत्री, सामाजिक न्यायमंत्री आणि कृषिमंत्री हे सगळे विदर्भातील असूनही गेल्या तीन वर्षांत विदर्भाचा आवश्यक तेवढा विकास झाला नाही. विदर्भातील भाजप आमदार आशीष देशमुख यांनीही कापसाच्या प्रश्नावर वेलमध्ये यावे हे सरकारसाठी धोक्याची घंटा असल्याचा इशारा पवार यांनी दिला. भाजपचे आमदार डॉ. अनील बोंडे यांनीही हिवाळी अधिवेशनात कापसाचा प्रश्न मांडा असे भेटून सांगितले होते, असा गौप्यस्फोट अजित पवार यांनी केला.
खोट्या आश्वासनांवर सत्ता टिकविता येणार नाही!
विरोधीपक्षात असताना भाजपनेते मुख्यमंत्र्यांसह सर्वच जण कापसाला सात हजार आणि सहा हजार रुपये दर देण्याची मागणी करत होते. आता तुम्ही राज्यात आणि केंद्रात सत्तेवर आला आहात; आता द्या सात हजार आणि सहा हजार भाव, असे आव्हान अजित पवारांनी सरकारला दिले. लक्षात ठेवा तुमच्या खोट्या आश्वासनांवर तुम्हाला सत्ता टिकवता येणार नाही. मतदार राजा आहे, तुमच्या अशा कर्तृत्वाने तुम्हालाही पायउतार व्हावे लागेल, असा इशाराही त्यांनी आपल्या भाषणात दिला. विदर्भ आणि मराठवाड्यात कापसाची स्थिती अतिशय वाईट आहे. त्या पीडित शेतकर्याला एकरी 25 हजार रुपयांची तर धानाला 10 हजार रुपयांची मदत मिळालीच पाहिजे. केवळ कर्जमाफी करून चालणार नाही तर नगदी पिकाला चांगला दर मिळाला पाहिजे; त्याशिवाय शेतकर्यांची परिस्थिती सुधारणार नाही, असेही अजित पवार यांनी नीक्षून सांगितले.
तिसर्या दिवशीही विधानपरिषद ठप्प!
शेतकरी कर्जमाफीसह शेतकर्यांच्या अन्य प्रश्नांसंदर्भात विधानपरिषदेत तिसर्या दिवशीही विरोधक आक्रमक राहिल्याने कुठलेही कामकाज झाले नाही. कर्जमाफीसह, बोंडअळीमुळे नुकसान झालेल्या शेतकर्यांना एकरी 25 हजार रूपये नुकसान भरपाई देण्याची मागणी मान्य करीत नाही, तोपर्यंत कामकाज चालू देणार नाही अशी भूमिका विरोधकांनी घेऊन जोरदार घोषणाबाजी करीत गोंधळ सुरू केल्याने सत्ताधारी पक्षाच्या सदस्यांनी याला प्रत्युत्तर म्हणून जोरदार घोषणाबाजी सुरू केली. सभागृहातील गोंधळ वाढत गेल्याने चारवेळा सभागृहाचे कामकाज तहकूब करण्यात आले. त्यानंतरही विरोधक आणि सत्ताधारी सदस्य समोरासमोर येवून जोरदार घोषणाबाजी करीत असल्यामुळे उपसभापती माणिकराव ठाकरे यांनी विधानपरिषदेचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब केले.