मुंबई ।राज्यातील सर्व रेल्वेगेट मानवरहित करण्याच्या महत्वाकांक्षी योजनेच्या अंमलबजावणीसाठी आज मुंबईत राज्य सरकार व केंद्र सरकार यांच्यात सामंजस्य करार झाला. या कामांसाठी निम्मा खर्च राज्य सरकारने व निम्मा खर्च केंद्र सरकारने करण्याची तरतूद या करारात आहे. जवळपास 10 हजार कोटी रुपये खर्चाच्या या कामांसाठी 5 हजार कोटी रुपये राज्य सरकारला द्यावे लागणार आहेत. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी या करारासाठी आज मुंबईत आलेले होते.
वाया जाणारे इंधन वाचणार
रेल्वे गेटवर गेटमन फाटक उघडत नाही तोपर्यंत रस्त्यावरच्या सर्वच वाहनांना खोळंबून राहावे लागते. सगळीकडेच अलिकडच्या काळात या ठिकाणांवर वाहतूक कोंडीची समस्याही दिवसेंदिवस तीव्र होते आहे. गेट बंद झाल्यापासून वाहतूक कोंडी सुरळीत होईपर्यंत रस्त्यावरच्या वाहनचालकांचा वेळही वाया जातो व इंधनाची विनाकारण नासाडी होते. हा सामंजस्य करार झाल्यानंतर मुंबईत आमदार राजुमामा भोळे व आमदार चंदू पटेल यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेेेेऊन त्यांचे खास आभार मानले. राज्यातील सुमारे 250 रेल्वेफाटकांवर उड्डाणपुलांची उभारणी होणार आहे. जिल्ह्यातील अंदाजे 10 उड्डाणपूल या याजनेतील कामांमध्ये प्रस्तावित आहेत.जळगाव शहराच्या दृष्टीने महत्वाच्या असलेल्या असोदा रेल्वेगेट, शिवाजीनगर व दूध फेडरेशन रेल्वेगेटच्या कामांचा या योजनेत समावेश प्राधान्याने करण्यात आलेला आहे, अशी माहिती आमदार राजुमामा भोळे व आमदार चंदू पटेल यांनी दिली.