राज्यात लाचलुचपत विभागातील पाच उपअधीक्षकांच्या बदल्या

0

भुसावळ। राज्यातील लाचलुचपत प्रतिबंधक विभागातील पाच उपअ धीक्षकांच्या बदल्या झाल्या आहेत. त्यात जळगावचे पोलीस उपअधीक्षक पराग सोनवणे यांचाही समावेश असून त्यांची मुंबई मुख्यालयात बदली झाली असून त्यांच्याजागी मुख्यालयातून गोपाळ ठाकूर येणार आहेत. मुख्यालयातील रमेश रामचंद्र चव्हाण यांची नवी मुंबई लाचलुचपत प्रतिबंधक विभागात तर नांदेडचे उपअधीक्षक माणिक विठ्ठलराव बेंद्रे यांची लातूर येथे तसेच लातूरचे सुरेश शिवाजी शेटकर यांची नांदेड येथे बदली करण्यात आली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे महासंचालक रवींद्र पाटील (मुख्यालय) यांनी याबाबतचे आदेश काढले आहेत.

पोलीस उपअधीक्षक पराग सोनवणेंची यशस्वी कारकिर्द
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची नोकरी म्हणजे तसा पाहिले तर काटेरी मुकूटच मात्र मुकूटाला परीधान करतानाच सर्वसामान्य नागरिकांमध्ये विश्‍वासार्हातेचे वातावरण निर्माण करतानाच सर्वच घटकातील तब्बल 60 भ्रष्टाचार्‍यांना टिपण्याचा विक्रम लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक पराग सोनवणे यांनी केला. पोलीस उपअधीक्षक डी.डी.गवारे यांच्या बदलीनंतर जळगावात कोण येणार याची तशी सर्वांनाच उत्सुकता होती. 1 फेबु्रवारी 2016 ला जळगावी बदलून आलेल्या पराग सोनवणे यांनी आपल्या कर्तृत्वाचा ठसा सुरूवातीपासूनच उमटवत जिल्हावासीयांवर आपल्या कामाच्या नैपुण्यातून चांगलीच छाप पाडली. कुणाच्याही दबावाला बळी न पडता दोन-चार नव्हे तर तब्बल 60 भ्रष्टाचार्यांवर कारवाई करीत भ्रष्टाचार्‍यांच्या उरात धडकी भरवली. आपल्या एक वर्ष सात महिन्यांच्या काळात त्यांनी सर्वसामान्य नागरिकांना प्रथम तत्वाने न्याय दिला. त्यामुळे त्यांची कारकिर्द जळगावकरांना निश्‍चितच प्रेरणादायी व आठवणीत राहील यात शंका नाही. तूर्त गणेशोत्सव होईस्तोवर सोनवणे यांच्याकडे जळगावचा पदभार राहणार आहे. कौटुंबिक कारणास्तव त्यांनी मुंबईत बदली मागितल्याने अधिकार्यांनी त्यांच्या विनंतीची दखल घेत त्यांना मुख्यालयात बदली देण्यात आली. नूतन अधिकारी गोपाळ ठाकूर काही दिवसातच रूजू होणार आहेत.