चंद्रपूर : एकीकडे राज्यातील उन्हाचा वाढता पार्याने हैराण झालेल्या नागरिकांना आता लोडशेडिंगलाही सामोरे जावे लागणार आहे. राज्यात लोडशेडींग वाढणार असल्याची शक्यता निर्माण झाली आहे. कारण चंद्रपूर जिल्ह्यातील कोराडीसह अनेक ठिकाणी वीजनिर्मिती प्रकल्पातील 2 संच तांत्रिक कारणामुळे बंद पडले आहेत. त्यामुळे तब्बल 1 हजार 160 मेगाव्हॅट वीजनिर्मितीवर परिणाम होत असून, राज्यात भारनियमन वाढण्याची चिन्हे आहेत.
राज्यात विजेच्या एकूण मागणीच्या तुलनेत वीजपुरवठा कमी असताना महानिर्मितीच्या कोराडीसह चंद्रपूर वीजनिर्मिती प्रकल्पातील संचच बंद पडले आहेत. कोराडी आणि चंद्रपूरमधील प्रत्येकी एक अशा 1 हजार 160 मेगावॅटचे दोन संच तांत्रिक कारणाने बंद पडले आहेत. त्यामुळे राज्यात ग्राहकांना जास्त प्रमाणात भारनियमनाचे चटके सहन करावे लागण्याचा धोका आहे.
प्रक्रियेत बिघाड
कोराडीत वीजनिर्मिती 660 मेगावॅटचा युनिट क्रमांक 10 चा बेल्ट अलायमेंट तुटले आहे. तर चंद्रपूरात काही संचात कोळशातून ज्वाला तयार होणार्या प्रक्रियेत बिघाड झाल्यामुळे हे संच बंद पडल्याचे महानिर्मितीकडून सांगितले जात आहे.
कोयनातील विजनिर्मिती वाढवली
विजेचा पुरवठा कमी पडू नये म्हणून महानिर्मितीने कोयनातील जलविद्युत प्रकल्पातून वीजनिर्मिती वाढवली आहे. पण पाण्याअभावी हे संच लवकरच बंद होण्याची शक्यता आहे. त्यामुळे हे दोन्ही संच त्वरित सुरू झाले नाही तर राज्याला मोठ्या प्रमाणावर भारनियमनाचे चटके सहन करावे लागण्याची चिन्हे आहेत.