पुणे । राज्यात जानेवारी ते डिसेंबर 2017 दरम्यान सहा हजार 144 स्वाइन फ्लू झालेल्या रुग्णांची नोंद झाली. 2016 च्या तुलनेत ही संख्या जास्त आहे. नाशिकसह नागपूर, अहमदनगर, पुणे ग्रामीण या भागात स्वाइन फ्लूमुळे मृत्यू झालेल्यांची संख्या मोठी आहे. 2017मध्ये देशभरात सर्वात जास्त मृत्यू महाराष्ट्रात झाले आहेत. तपासणी करण्यात आलेल्या रुग्णांपैकी 6144 रुग्णांना स्वाइनची लागण झाल्याचे निष्पन्न झाले, तर 778 रुग्णांचा स्वाइनमुळे मृत्यू झाला, अशी माहिती राज्याच्या आरोग्य विभागाकडून देण्यात आली.
22 लाखांवर रुग्णांची तपासणी
याची गंभीर दखल घेत राज्य आरोग्य विभागांच्या सूचनेनुसार सर्व पालिका, ग्रामीण आणि शासकीय रुग्णालय स्तरावर दररोज तब्बल सहा हजार 115 रुग्णांची तपासणी करण्यात येत असून, आतापर्यंत राज्यातील 22 लाखांवर रुग्णांची तपासणी करण्यात आली आहे. राज्यभरात स्वाइनचा सर्वांत जास्त कहर जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर या तीन महिन्यांत उद्भवला. मृत्यू झालेल्यांपैकी जानेवारी 4, फेब्रुवारी 5, मार्च 80, एप्रिल 93, मे 53, जून 46, जुलै 102, ऑगस्ट 135, सप्टेंबर 156, ऑक्टोबर 83, नोव्हेंबर 19, तर डिसेंबर 2 रुग्णांची नोंद झाली.
नवीन वर्षात 42 हजार 492 व्यक्तींना लस
गेल्यावर्षी एक लाखांहून अधिक गरोदर माता, उच्च रक्तदाब आणि मधुमेह रुग्ण, तसेच आरोग्य कर्मचार्यांना स्वाइन फ्लू प्रतिबंधात्मक एन्फ्ल्युएन्झा लस देण्यात आली होती. यावर्षी राज्य सरकारने राज्यातील 59 हजार 659 संशयित रुग्णांना स्वाइन फ्लूवरील ऑसेलटॅमिवीर औषध देण्यात आले असल्याचे आरोग्य विभागातील अधिकार्यांनी सांगितले. या वर्षात 1 जानेवारी ते 31 डिसेंबर दरम्यान 42 हजार 492 व्यक्तींना लस देण्यात आली, तर जानेवारी 2018 च्या पहिल्या 4 दिवसांत 99 व्यक्तींचे लसीकरण करण्यात आले. पावसाळ्यानंतर वातावरणात अचानक थंडी वाढते. परिणामी या महिन्यात ही साथ आपले उग्र रूप धारण करण्याची शक्यता असते. गेल्या वर्षी पावसात स्वाइनचा कहर दिसून आला.