राज्यात वाघ आणि सिहांची एकत्रित सत्ता

0

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा विरोधकांवर घणाघात
अंतिम आठवडा प्रस्तावाला दिले उत्तर

मुंबई:- राज्यात सिंह आणि वाघ एकत्र येवून दमदार सत्ता सध्या राबवित आहोत. भविष्यात देखील असेच वाघ आणि सिंह एकत्र रहात 2019 मध्येही आम्ही सत्ता राखू. वाघ आणि सिंहाच्या यांच्या वाटेत येणाऱ्या उंदरांचा निपात करू असे अंतिम आठवडा प्रस्तावाला उत्तर देताना मुख्यमंत्री फडणवीस विरोधकांच्या मूषक पुराणावर पलटवार केला. विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील तुमचे मूषक पुराण ऐकले. फारच चांगले होते. त्यामुळे तुम्ही चांगले पटकथाकार आणि संवाद लेखक व्हाल मी तुम्हाला सांगतो असे सांगत त्यांनी विरोधी पक्षनेत्यांना टोला लगावला.

उद्योग मंत्री सुभाष देसाई यांना क्लिन चीट.!
मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांनी विरोधी पक्षांनी केलेल्या भ्रष्टाचाराच्या सर्व आरोपांना सडेतोड उत्तरे देत अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी शंकाचे निरसन केले. त्यात नाशिक जिल्ह्यातील गोंदे दुमाला आणि वाडिव-हे येथील औद्योगिक वापराच्या जमिनी शेतक-यांना परत देण्याच्या प्रकरणी के पी बक्षी समितीचा चारशे पानी अहवाल त्यानी सादर केला या अहवालात देसाई यांच्यासह गेल्या १५ वर्षात अशा प्रकाराचे जमिन गैरअधिसूचित करण्याचे जे १६० निर्णय झाले त्यांचा अभ्यास करून उद्योगंमंत्री देसाई यांना क्लिनचिट दिल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.

राज्यात ई निविदाप्रक्रियेत काही दोष आढळून आल्याने त्यात बदल केला असल्याचे ते म्हणाले. महापालिका , नगरपरिषद याना प्रकल्पांसाठी निधी दिला , पाणीपुरवठा , गटारे यासाठी ही दिला २६० पैकी २३६ शहरात कचरा वर्गीकरण सुरू झाले आहे. खतनिर्मिती ला प्रोत्साहन दिल्याची माहिती त्यानी दिली. यासाठी पूर्वीच्या तुलनेत तिप्पट निधी उपलब्ध करून दिला,स्मार्ट सिटी योजनेतील ८ शहरात २० हजार कोटींचे प्रकल्प सुरू आहेत, असे ते म्हणाले. राज्यात प्लास्टिक बंदी मागे घेणार नाही, मात्र उत्पादकांशी चर्चा करू असे ते म्हणाले तसेच ३ महिने दंडात्मक कारवाई न करण्याचे मुख्यमंत्र्यांनी संकेत दिले.

72 हजार जागा भरणार
राज्यातील विविध विभागात मोठ्या प्रमाणावर रिक्त जागा आहेत. त्यातील 72 हजार जागा भरण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केली. यातील 36 हजार जागा यावर्षी तर राहीलेल्या 36 हजार जागा पुढील वर्षी भरणार असल्याची घोषणा त्यांनी केली. विधानसभेत विरोधकांनी मांडलेल्या अंतिम आठवडा प्रस्तावाला उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी वरील घोषणा केली.राज्य सरकारकडून कृषी विभाग 2 हजार 572, पशु व दुग्धसंवर्धन विभागातील 1 हजार 47 मत्सव्यवसाय विभाग 90, ग्रामविकास विभाग 11 हजार 500, गृह विभाग 7 हजार111, सार्वजनिक बांधकांम विभाग 8 हजार 337, जलसंपदा विभाग 8 हजार 227, जलसंधारण विभाग 4 हजार 223, सार्वजनिक आरोग्य विभाग1हजार आणि नगरविकास विभागाच्या 1 हजार 500जागा अशा मिळून एकूण 36हजार रिक्त जागा यावर्षी तर दोन वर्षात मिळून 72 हजार जागा भरणार असल्याचे त्यांनी यावेळी जाहीर केले.