राज्यात विक्रमी वीजमागणी!

0

पुणे । राज्याच्या तापमानात झपाट्याने वाढ होत असून पार्‍याने चाळिशी ओलांडली आहे. अनेक ठिकाणी तापमानाचा पारा 40 अं.से.च्या पुढे गेला आहे. उष्णता वाढल्याने विजेच्या मागणीतही विक्रमी वाढ झाली आहे. महावितरण कंपनीकडून पुरविण्यात येणार्‍या विजेच्या मागणीने 19 हजार मेगावॉटचा टप्पा ओलांडला आहे. औष्णिक वीजनिर्मिती केंद्रात कोळशाचा पुरवठा कमी असला, तरी इतर प्रकल्पांची क्षमता वाढवून त्याचप्रमाणे खुल्या बाजारातील वीज खरेदी वाढवून विजेची वाढीव मागणी पूर्ण करण्यात येत आहे. त्यामुळे तुर्तास राज्यावर वीज कपातीचे संकट नसल्याचे महावितरणच्या सुत्रांनी सांगितले.

कोयनातून 700 मेगावॉट विजनिर्मिती
मागील वर्षी ऑक्टोबर महिन्यात निर्माण झालेल्या कोळशाच्या तीव्र टंचाईमुळे राज्यावर वीजकपातीचे संकट आले होते. कोळसा टंचाईचे हे सावट अद्यापही दूर झालेले नसून खासगी प्रकल्पांसह महानिर्मिती कंपनीचे खापरखेडा, कोरडी, नाशिक आदी प्रकल्पातील वीजनिर्मिती संच अद्यापही कोळशाच्या अपुर्‍या पुरवठ्यामुळे बंद आहेत. त्याचप्रमाणे उन्हाळा सुरू झाला असल्याने पाणी वाचविण्याच्या दृष्टीने जलविद्युत प्रकल्पांवरही नियंत्रण आणण्यात आले आहे. 1920 मेगावॉट वीजनिर्मितीची क्षमता असलेल्या कोयना प्रकल्पातून सध्या 700 मेगावॉट विजेची निर्मिती होत आहे.

500 मेगावॉटपर्यंत सरासरी खरेदी
वाढती मागणी लक्षात घेता सध्या खुल्या बाजारातून वीज खरेदी वाढविण्यात आली आहे. सुमारे पाचशे मेगावॉटपर्यंत सरासरी खरेदी असताना सद्यस्थितीत सुमारे दोन हजार मेगावॉट विजेची खुल्या बाजारातून खरेदी करण्यात येत आहे. त्यात अल्प मुदतीच्या करारानुसार 655, तर पॉवर एक्स्चेंजमधून 1300 मेगावॉट वीज खरेदी होत आहे. सध्या औष्णिक केंद्रातून वीजनिर्मितीच्या क्षमतेत काहीशी वाढ करण्यात आली आहे. चंद्रपूर, पारस, परळी, भुसावळ आदी केंद्रांतून क्षमतेच्या आसपास वीजनिर्मिती केली जात आहे. वीजनिर्मिती केंद्राची क्षमता वाढ आणि खासगी बाजारातून आवश्यकतेप्रमाणे वीज खरेदी करून सध्या तरी वाढलेली मागणी पूर्ण करण्यात येत आहे.

तीन-चार दिवसांत मागणी वाढली
मार्चच्या सुरुवातीपासूनच राज्यात तापमानाने चाळिशी गाठली आहे. त्यामुळे विजेच्या मागणीत सातत्याने वाढ गेली आहे. 16 ते 17 हजार मेगावॉटपर्यंत राज्यात सरासरी विजेची मागणी असते. किमान तापमानाचा पारा 35 ते 37 अंशावर असताना 1 मार्चला 18 हजार 300 मेगावॉट, तर 12 मार्चला 18 हजार 700 मेगावॉटपर्यंत विजेची मागणी पोहोचली होती. तीन ते चार दिवसांपासून राज्याच्या विविध भागांत उषणतेची लाट आल्याने विजेची मागणी तब्बल 19 हजार 78 मेगावॉटवर गेली आहे. वीजेच्या मागणीने प्रथमच 19 हजार मेगावॉटचा टप्पा ओलांडला आहे. शनिवारीही वीजमागणीत आणखी वाढ झाली.