नाशिक : राज्य सरकारने कूटनीती करत शेतकरी संपात फूट पाडण्याचा प्रयत्न शनिवारी केला. मात्र त्यानंतरही रविवारी राज्यात शेतकरी संप सुरूच असल्याचे दिसून आले. काही ठिकाणी तर संपाला हिंसक वळण लागले. नाशिकमध्ये परिस्थिती चिघळली होती. शेतमाल गुजरातमध्ये पाठविला जात असल्याचे समजताच संतप्त शेतकर्यांनी संताप व्यक्त केला. तसेच पोलिसांवर दगडफेक केली. संतप्त जमावाला पांगविण्यासाठी पोलिसांनी शेतकर्यांवर सौम्य लाठीमार करत हवेत गोळीबार केला. दगडफेकीत तीन पोलिस कर्मचारी जखमी झाले. काही वेळात पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणली.
शेतमाल रस्त्यावर फेकला
गुजरातमध्ये मोठ्या प्रमाणावर भाजीपाला, फळे आणि अन्य शेतमालाची वाहतूक होत असल्याचे समजताच नाशिक जिल्ह्यातील कळवण तालुक्यातील शेतकर्यांनी ट्रकमधील शेतमाल रस्त्यावर फेकून देण्यास सुरवात केली. अडीचेश-तिनशे शेतकर्यांनी रास्तारोको करत गोंधळ घालण्यास सुरवात केल्याने अभोणा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेवून परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला.
वाहने आडविली
घटनास्थळी आलेल्या पोलिसांनी वाहने न आडविण्याचे आवाहन शेतकर्यांना केले, मात्र संतप्त शेतकरी आणि पोलिसांत बाचाबाची झाली. जमावाने पोलिसांवर आणि त्यांच्या वाहनांवर दगडफेक केल्याने परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी सौम्य लाठीमार करत हवेत गोळीबार केला. शेतकर्यांनी केलेल्या दगडफेकीत तीन पोलीस कर्मचारी जखमी झाले. याचवेळी नाशिकमधील कळवणजवळील दिंडोरी तालुक्यातील पाडाणे येथेही जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी लाठीमार केल्यानंतर जमाव पांगला.
पोलिस बंदोबस्तात शेतमाल बाजारात
शेतकरी संप सुरु ठेवण्याचा निर्धार शेतकर्यांनी केला असला तरी राज्यातल्या बाजारपेठांमध्ये भाजीपाल्याची आवक सुरु झाली आहे. रविवारी सकाळी नाशिक बाजारात 195 ट्रक भाजीपाला पोलिस बंदोबस्तात बाजार समितीत आणण्यात आला, तर शहराची गरज लक्षात घेता 95 टँकर दूधही बाजारात आणण्यात आले. तब्बल 150 शेतकर्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत आणि त्यांची धरपकड सुरु आहे. अन्य ठिकाणच्या काही बाजारातही असेच चित्र होते.
चौथ्यादिवशीही संप सुरूच
शुक्रवारी रात्री उशीरा मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांच्यासोबत चर्चा झाल्यावर शेतकरी संघटनेच्या नेत्यांनी संप मागे घेत असल्याचे जाहीर केले होते. मात्र यानंतरही शेतकरी आक्रमक असून सर्व मागण्या मान्य होईपर्यंत संप सुरुच राहणार असा पवित्रा शेतकर्यांनी घेतल्याने विविध मागण्यांसाठी शेतकर्यांनी पुकारलेला संप चौथ्या दिवशीही सुरुच होता. सर्व मागण्या मान्य होईपर्यंत संप सुरु ठेवणार असल्याचे पुणतांब्यातील शेतकर्यांनी म्हटले आहे. रविवारी नाशिक बाजार समितीमधील व्यवहार ठप्प होते. सर्वाधिक वर्दळ असणार्या बाजार समितीमध्ये शुकशुकाट पाहायला मिळाला. दुसरीकडे औरंगाबाद जिल्ह्यामधील पैठण तालुक्यातील जायकवाडी आणि पाचोड येथे आठवडी बाजार बंद ठेवण्यात आले. पाचोडमध्ये शेतकर्यांसोबतच व्यापारी आणि शिवसेनेने बंदला पाठिंबा दिला आहे. सोलापूरमधील मोहोळ येेथेही शेतकर्यांनी आठवडी बाजार बंद पाडून सरकारने संपूर्ण कर्जमाफी करावी, अशी मागणी केली.
पवारांनी हमी भाव का दिला नाही?
गेल्या 15 वर्षात शेतकर्यांना हमीभाव द्यायला तुमचे हात काय बांधले होते काय? शरद पवार यांना शेतकर्यांचा राजा ही मिळालेली पदवी जाईल अशी भीती वाटते. ती पदवी जाईल या भीतीनेच ते बेछूट आरोप करत आहेत. शेतकर्यांचा संप मिटल्याने काहींची दुकाने 2 दिवसांतच बंद झाली, मात्र या 2 दिवसांत लूट करणारे कोणत्या पक्षाचे आहेत ते पाहा. संपामध्ये शेतकरी दूध, फळं वाया घालवत नाही, पण शेतकर्यांच्या नावाने बदनामी सुरु आहे. आमच्याकडून शेतकरी नेत्यांना अजूनही चर्चेची दारं खुली आहेत.
– चंद्रकांत पाटील, महसूलमंत्री
जयाजी शिंदेंच्या निवासस्थानी बंदोबस्त
मुख्यमंत्र्यांच्या बैठकीनंतर संप मागे घेण्याची घोषणा करून शेतकर्यांच्या रोषाला बळी पडलेले शेतकरी नेते जयाजी सूर्यवंशी रविवारी औरंगाबाद शहरात दाखल झाले. संतप्त शेतकर्यांकडून कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी ते घरी न जाता अज्ञात स्थळी थांबले होते. सूर्यवंशी यांच्या निवासस्थानाबाहेर मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.