राज्यात शेताच्या बांधावरच कृषी विभागाच्या बैठका

0

मुंबई – मंत्र्यांच्या बैठका म्हटल्या कि, वातानुकुलीन दालन, शाही जेवण असा सगळा राजेशाही थाट असतो. पण या सगळ्याला फाटा देत, कृषी विभागाच्या बैठका शेतकर्‍यांसमवेत शेतावरच घेण्याचा निर्णय कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी घेतला आहे. त्यामुळे आता राज्यभरात शेतकर्‍यांच्या बैठका शेतावरच होताना दिसणार आहेत.

बुलढाणा येथील शेताच्या बांधावरच सदाभाऊंनी बैठक घेऊन या निर्णयाचा शुभारंभ केला आहे. राज्यातील प्रत्येक गावात शेतावरच कृषी अधिकार्‍यांची आढावा बैठक घेण्यात येणार आहे या बैठकीत शेतकरी उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे शेतकर्‍याची गार्‍हाणी ऐकून समोरच अधिकार्‍यांना निर्देश दिले जात आहेत. मी शेतकर्‍यांचा नेता आहे. शेतकर्‍यांना हे सरकार आपलं वाटलं पाहिजे त्यामुळेच हा निर्णय घेतल्याचे सदाभाऊंनी जनशक्तीशी बोलताना सांगितले. कृषी अधिकार्‍यांच्या बैठका वातानुकुलीन दालनात होतात. काही निर्णय घेतल्यानंतर संबंधित अधिकार्यांना निर्देश दिले जायचे. पण त्यांची अंमलबजावणी होत नसल्याचे दिसून आले. आता शेताच्या बांधावरच बैठका होणार असल्याने आणि या बैठकांना स्वतः शेतकरी हजर असल्याने त्यांच्या समस्या गार्‍हाणी समोरासमोर मांडता येणार आहे तसेच त्यावर काय निर्णय घेतला याची माहिती त्यांना मिळणार आहे असे सदाभाऊंनी सांगितले. राज्यभरातील एकूण 1 कोटी 36 लाख खातेदार आहेत. त्यामुळे राज्यातील शेतकर्‍यांची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांच्या समस्याही राज्यमंत्र्यांना जाणून घेता येणार आहेत. शेतकर्‍यांच्या आत्महत्या आणि कर्ज माफीचा प्रश्‍न अनेक दिवसापासून गाजत आहे. सरकार शेतकरी विरोधी असल्याचा आरोप विरोधकांकडून केला जात आहे. या पार्शवभूमीवर सदाभाऊंचा निर्णय हा शेतकर्‍यांच्या मनात सरकारविषयी चांगली भावना निर्माण करण्याचा आहे. आजपर्यंत अनेक कृषी मंत्री होऊन गेले मात्र सदाभाऊंचा निर्णय वेगळाच ठरला आहे.