अलिबाग। राज्यातील कलावंतांना चांगले, हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करुन देणे हे राज्यकर्ते म्हणून आमचे कर्तव्य आहे. म्हणुनच राज्यात नवीन नाट्यगृहांची निर्मिती करताना जुन्या नाट्यगृहांचे आधुनिकीकरण करून राज्याची सांस्कृतिक संपदा जोपासणार, अशी घोषणा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. अलिबाग शहरात पीएनपी सांस्कृतिक कलाविकास मंडळ या संस्थेने सहकारी तत्वावर उभारलेल्या राज्यातील पहिल्या नाट्यगृहाचे लोकार्पण फडणवीस यांच्या हस्ते रिमोट कंट्रोलद्वारे कळ दाबून अॅडव्होकेट नाना लिमये रंगमंचाचा पडदा उघडण्यात आला. त्यानंतर अलिबाग येथील नमन नृत्य संस्थेच्या कलावंतांनी नांदीनृत्य सादर करुन या नाट्यगृहाचे उद्घाटन झाले. यावेळी राज्याचे शालेय शिक्षण, सांस्कृतिक कार्य व क्रीडा मंत्री विनोद तावडे, जिल्हा परिषद अध्यक्ष आदितीताई तटकरे, आमदार जयंत पाटील, आमदार सुनिल तटकरे, आमदार सुभाष उर्फ पंडितशेट पाटील, आमदार धैर्यशील पाटील, आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक पीएनपी सांस्कृतिक कलाविकास मंडळाच्या अध्यक्ष चित्रलेखा पाटील यांनी केले. याप्रसंगी सदर नाट्यगृह उभारणीत मोलाची कामगिरी करणारे ज्येष्ठ रंगकर्मी भाऊ सिनकर, शशिकांत मोहिते, भगवान मालपाणी, श्री. डिसूजा, सौरभ खेर यांचा मुख्यमंत्री फडणवीस यांच्याहस्ते सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन सिद्धार्थ चांदेकर आणि भार्गवी चिरमुले यांनी केले. या कार्यक्रमास अलिबागकर नाट्यरसिकांची मोठ्याप्रमाणावर उपस्थिती होती.
यावेळी आमदार जयंत पाटील यांचा फडणवीस यांच्या हस्ते वाढदिवसानिमित्त सत्कार करण्यात आला.फडणवीस म्हणाले की राज्यात कलेचे क्षेत्र रुंदावत आहे. असे असतांना विविध कलाप्रकारांच्या सादरीकरणासाठी राज्यात चांगल्या नाट्यगृहांची आवश्यकता आहे. नाट्यकला ही राज्याची सांस्कृतिक संपदा आहे. ही संपदा जोपासण्यासाठी राज्यात नवी नाट्यगृहे उभारण्यासाठी चालना शासन देईल. जुन्या नाट्यगृहांचे आधुनिकरण करण्यासही शासनाचे प्राधान्य असेल, असे फडणवीस यांनी सांगितले. त्याच प्रमाणे सिनेरसिकांना दर्जेदार सिनेमे पाहता यावे यासाठी थिएटर उपलब्ध करण्यासाठी शासन प्रयत्न करीत आहे, असेही त्यांनी सांगितले.
मुख्यालयाच्या ठिकाणी नाट्यगृह असावे
1 जीएसटी करप्रणाली लागू झाल्यापासून नाट्य व चित्रपट निर्मात्यांना वाटणारी चिंता लक्षात घेता शासनाने 250 रुपयांवरील तिकीटांवर जीएसटी आकारण्याची मर्यादा ही 500 रुपयांपर्यंत वाढवावी, अशी विनंती जीएसटी नियामक मंडळाला केली आहे.
2तिकिटांवरील कराच्या रकमेतून राज्याला प्राप्त होणारा निधी नाट्यगृहे बांधण्यासाठीच वापरायचा असे धोरणा शासनाने ठरविले आहे, असे राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनी आज येथे जाहीर केले. तावडे यांनी राज्यातील प्रत्येक जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणी नाट्यगृह असावे, असा पुनरुच्चार केला. 3नव्या पिढीला प्रेरणा मिळावी यासाठी जुन्या कलावंतांच्या आठवणी डिजिटल स्वरुपात संग्रहीत करण्याचा उपक्रमही शासनाने सुरु केल्याची माहिती तावडे यांनी यावेळी दिली.ज्येष्ठ रंगकर्मी यांचा सन्मान