पुणे जिल्ह्यात 114 मृत्यू तर नाशिकमध्ये 55 मृत्यू
मुंबई ( निलेश झालटे ) : देशभरात बालकांच्या मृत्यूंच्या घटनेने आरोग्य विभागाचे धिंडवडे निघत असताना राज्यातदेखील आरोग्य विभागाच्या चिंधड्या उडाल्याचे चित्र आहे. गेल्यावर्षी धुमाकूळ घातलेल्या स्वाईन फ्लूमुळे याहीवर्षी आतंक कायम ठेवला असून, जानेवारीपासून आतापर्यंत 9 महिन्यात तब्बल 532 बळी राज्यात गेले असल्याची माहिती आरोग्य विभागाकडून मिळाली आहे. 532 जणांचा फ्लूने मृत्यू झाला असून, मृत्यूच्या उंबरठ्यावर व्हेंटीलेटरवर 45 जण असल्याची माहिती आहे. विशेष म्हणजे, महाआरोग्य शिबिराची नांदी राज्यभरात पोहोचविणारे आरोग्यदूत पालक असलेल्या नाशिकमध्ये सर्वाधिक 55 लोक दगवल्याची माहिती आहे. तर पुणे ग्रामीण, शहर आणि मनपा मिळून 114 जणांचा मृत्यू स्वाईन फ्लूमुळे झाली असल्याची माहिती मिळाली आहे.
नाशिक, पुण्यात सर्वाधिक कहर
उत्तरप्रदेशमध्ये बालकांचा मृत्यू झाल्यानंतर नाशिकमध्येही बालकांच्या मोठ्या प्रमाणावर मृत्यूच्या आकड्यांनी आरोग्य व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह आले होते. आता स्वाईन फ्लूनेदेखील सर्वाधिक 55 बळी नाशिकमध्ये गेल्याची माहिती आहे. यानंतर पुणे शहर 33, पुणे ग्रामीण 38, पुणे मनपा 43, मुख्यमंत्र्यांच्या नागपूर 37, तर अहमदनगरमध्ये 33 जणांचा मृत्यू झाला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत आकडेवारी कमी असली तरी बळींवर अंकुश आणण्यात मात्र अपयशच आल्याचे चित्र आहे.
आरोग्य विभाग सज्ज, मात्र बळी थांबेना!
स्वाईन फ्लूवर नियंत्रण आणण्यासाठी आरोग्य विभाग सज्ज असल्याचेही समजते. राज्यभरात संशयित 15.25 लाख रुग्णांना तपासले असून, 34 हजार लोकांना प्रतिबंधात्मक लसीकरण केले असल्याचे आरोग्य विभागाने सांगितले आहे. तसेच 40 हजार लोकांना गोळ्या वाटप करण्यात आले आहे. सर्व शासकीय हॉस्पिटलमध्ये स्वाईन फ्लूवर उपचार केले जात असून, यंत्रणा सज्ज असल्याची माहिती देण्यात आली आहे. सर्व ठिकाणी विलगीकरण कक्षदेखील तयार असल्याचे सांगितले आहे.
स्वाईन फ्लूवर नियंत्रण आणण्यासाठी शासकीय यंत्रणा पूर्णपणे सज्ज आहे. आरोग्य विभाग सज्ज असून, नागरिकांनी काळजी करू नये. शंका असल्यास नागरिकांनी तात्काळ शासकीय हॉस्पिटलमध्ये जाऊन उपचार करावेत.
– डॉ. दीपक सावंत, आरोग्यमंत्री
आकडेवारी (जानेवारी ते 10 सप्टेंबरपर्यंत)
55 : नाशिक
33 : पुणे शहर
38 : पुणे ग्रामीण
43 : पुणे मनपा
37 : नागपूर
33 : अहमदनगर
05 : जळगाव
01 : यवतमाळ
02 : धुळे
532 : एकूण स्वाईनग्रस्त