राज्यात १४ हजार नवे कुष्ठरूण!

0

सार्वजनिक आरोग्यमंत्री डॉ. दिपक सावंत यांची माहिती

मुंबई :- राज्यात आतापर्यत राबविण्यात आलेल्या तीन विशेष शोध मोहिमेत १४ हजार नवीन कुष्ठरोग आढळून आले आहे.या कुष्ठरूग्णांना उपचाराखाली आणण्यात आले आहे. राज्यातील कुष्ठ रूग्णालय आणि कुष्ठरोगांच्या वसाहतींना उर्जित अवस्था प्राप्त करून देण्यासाठी प्रयत्न केले जातील अशी माहिती सार्वजनिक आरोग्य मंत्री डॉ. दिपक सावंत यांनी लक्षवेधीच्या उत्तराला दिली.

विधानसभेत अमित देशमुख यांनी राज्यात केलेल्या पाहणीत ५ हजार कुष्ठरूग्णांची नोंद झाल्याचे जानेवारी महिन्याच्या निदर्शनास आल्यासंदर्भात लक्षवेधी सुचनेव्दारे प्रश्न उपस्थित केला होता. या प्रश्नाला उत्तर देतांना आरोग्य मंत्री डॉ.दिपक सावंत म्हणाले राज्यात २००४ साली कुष्ठरूग्ण शुन्यावर आल्यामुळे यासाठी असलेली पदे व्यपगत करण्यात आली होती. मात्र २०१५ मध्ये काही जिल्हयात कुष्ठरोग शोध मोहिम राबविण्यात आली. या मोहिमेत ४ कोटी ५९ लाख नागरिकांची शारिरीक तपासणी करण्यात आली.त्यापैकी १ लाख ६४ हजार ९६४ रूग्ण संशयीत आढळून आले. या संशयीत रूग्णातून ५ हजार ७३ नवे कुष्ठरूग्ण आढळून आले.

जानेवारी १८ पर्यंत राबविण्यात आलेल्या शोध मोहिमेत १४ हजार २८७ नवे कुष्ठरोग आढळून आले आहेत. कुष्ठरोग निवारण्यासाठी देण्यात आलेला निधी खर्च केला जात असून जनजागृतीचे काम मोठया प्रमाणावर हाती घेण्यात आले आहे. कुष्ठरोगांच्या वसाहतींची दुरावस्था झाली असलीतरी या वसाहतींना उर्जित अवस्था प्राप्त करून देण्यासाठी प्रयत्न केले जातील. सर्व वसाहतीमधील कुष्ठरूग्णांना एका छताखाली आणून त्यांच्यावर चांगल्यापध्दतीने उपचार करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे डॉ. सावंत यांनी सांगितले. यावेळी डॉ. जयप्रकाश मुंदडा, संजय केळकर यांनी चर्चेत सहभाग घेतला.