औरंगाबाद- महाराष्ट्रात जूनमध्ये चांगली सुरुवात केल्यानंतर जुलैपासून नैऋत्य मान्सूनचे गणित बिघडले. जुलैच्या दुसर्या आठवड्यापासून राज्याच्या बहुतांश भागात पावसाने खंड दिला आहे. हा खंड आता 22 ऑगस्टपर्यंत लांबण्याची शक्यता हवामानतज्ज्ञांनी वर्तवली आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भाला या ब्रेकचा सर्वाधिक फटका बसणार आहे. आता सर्व आशा परतीच्या पावसावरच असून, आतापर्यंत सप्टेंबरमधील पावसानेच या भागाला तारले आहे.
गतवर्षीही जुलै-ऑगस्टमध्ये मान्सूनने जवळपास 55 दिवसांचा ब्रेक घेतला होता. याचीच पुनरावृत्ती यंदा होण्याची दाट शक्यता जाणकारांनी व्यक्त केली आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या साप्ताहिक अहवालानुसार, 15 ऑगस्टपर्यंत नैऋत्य मान्सून देशाच्या उत्तर भागात जास्त सक्रिय राहील. मान्सूनचा ट्रफ उत्तरेकडे असल्याने कमी दाबाचे क्षेत्र उत्तर भारतात जास्त प्रमाणात निर्माण होईल. त्यामुळे या काळात उत्तरेकडील राज्यांत चांगला पाऊस होईल.