राज्यात 3 हजार जणांना स्वाइन फ्लूची लागण

0

पुणे । राज्यात स्वाइन फ्लूने थैमान घातले आहे. राज्यात आतापर्यंत 18 लाख 72 हजार पेक्षा जास्त रुग्णांची स्वाइन फ्लूची तपासणी करण्यात आली आहे. त्यापैकी 3 हजारपेक्षा जास्त रुग्ण पॉझिटिव्ह सापडले आहेत. राज्यात 345 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. पुण्यात स्वाइन फ्लूमुळे आणखी एका महिलेचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे शहरातील मृत्यूचा आकडा 75 वर पोहचला आहे. त्यामुळे नागरीकांनी स्वतःची विशेष काळजी घेण्याचे आवाहन पालिकेतर्फे करण्यात आले आहे.

आणखी एका महिलेचा मृत्यू
यंदा स्वाइन फ्लूचा फैलाव वाढला आहे. सध्याचे वातावरण स्वाइन फ्लूच्या विषाणूसाठी पोषक ठरत आहे. त्यामुळे रुग्णांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. पुण्यात उपचारासाठी आलेल्या सोलापूर जिल्ह्यातील 52 वर्षीय महिलेचा स्वाइन फ्लूने बुधवारी मृत्यू झाला. त्यामुळे मृतांची संख्या 75 वर पोहचली आहे. 24 जुलै रोजी महिलेच्या घशातील स्त्रावाचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले होते. त्याचदिवशी तिला स्वाइन फ्लू झाल्याचे निदान झाले होते.

महाराष्ट्रात मृतांचा आकडा जास्त
केंद्रीय साथरोग विभागाकडे उपलब्ध असलेल्या माहितीनूसार यावर्षी सर्वाधिक मृत्यू हे महाराष्ट्रात झाले आहेत. राज्यात दररोज चार ते साडेचार हजार संशयित रुग्णांचे स्वाइन फ्लूसाठी स्क्रिनिंग करण्यात येत आहे. त्यापैकी 34 हजाराहून अधिक संशयित रुग्णांना टॅमी फ्लूच्या गोळ्या देण्यात आल्या. या औषधांचा पाच दिवसांचा कोर्स केल्यानंतर स्वाइन फ्लू आटोक्यात येतो, असे निदर्शनास आले आहे. त्याचबरोबर मधुमेह व उच्चरक्तदाबाच्या रुग्णावर त्वरीत उपचार केले जात आहेत.

शहरात 369 जणांना स्वाइन फ्लू
पुण्यात आतापर्यंत 4 लाख 75 हजार 76 रुग्णांचे स्क्रीनिंग करण्यात आले आहे. त्यापैकी 9 हजार 139 रुग्णांची तपासणी करण्यात येत आहे. 1 हजार 517 जणांचे स्वॅब तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. त्यापैकी 369 रुग्ण पॉझिटिव्ह सापडले आहेत. यापैकी 272 रुग्णांवर यशस्वी उपचार करण्यात आले असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर सध्या शहरात 13 रूग्ण व्हेंटिलेटरवर असून 9 रुग्ण साधारण वॉर्डमध्ये उपचार घेत आहेत, अशी माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे.