मुंबई:१७ व्या लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातील प्रचार अखेर आज सायंकाळी ६ संपला. चौथ्या टप्प्यात महाराष्ट्रात उर्वरित १७ लोकसभा मतदारसंघांमध्ये मतदान होणार आहे. यात मुंबईतील सर्व सहा मतदारसंघांचा समावेश असणार आहे. दरम्यान, चौथ्या टप्प्यात देशातील ७१ मतदारसंघांमध्ये मतदान होणार असून यात एकूण ९ राज्यांमध्ये मतदान होईल. लोकसभेच्या चौथ्या टप्प्यासाठी २९ एप्रिल रोजी सकाळी ७ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत मतदान होणार आहे. या टप्प्यात राज्यात तब्बल ३.११ कोटी मतदार मतदानास पात्र असणार आहेत. या मतदानाबरोबरच ३२३ उमेदवारांचे भवितव्य मतदानयंत्रात बंद होणार आहे.
१७ मतदारसंघांत मतदान
नंदुरबार, धुळे, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिवंडी, कल्याण, ठाणे, उत्तर मुंबई, उत्तर पश्चिम मुंबई, उत्तर मध्य मुंबई, ईशान्य मुंबई, दक्षिण मध्य मुंबई, दक्षिण मुंबई, मावळ, शिरूर, शिर्डी या १७ मतदारसंघांत चौथ्या टप्प्यात मतदान होणार आहे.
दिग्गज रिंगणात
केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे (धुळे), उर्मिला मातोंडकर (उत्तर मुंबई), प्रिया दत्त (उत्तर मध्य मुंबई), मिलींद देवरा (दक्षिण मुंबई), अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार हे या टप्प्यातील ठळक चेहरे असणार आहेत.