राज्यामध्ये कचरा डपिंग बंद करणार

0

मुख्यमंत्र्यांचे विधानसभेत आश्वासन
अजित पवारांनी उपस्थित केला होता प्रश्न

मुंबई : शहरीकरण वाढत चालल्यामुळे कचऱ्याचा प्रश्न गंभीर होत चालला आहे. मात्र यासाठी राज्य सरकारने विशेष मोहीम हाती घेतली आहे. कचऱ्याचे विलगीकरण करून नव्या तंत्रज्ञानाचा वापर करून कचरा प्रक्रिया करून नष्ट केला जाईल, असे सांगत राज्यामध्ये कचरा डम्पिंग लवकरच बंद केले जाईल, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. कचऱ्याचे डम्पिंग करण्याऐवजी प्रक्रिया करण्याच्या संदर्भात उच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र दाखल केले असल्याचे देखील मुख्यमंत्र्यांनी सांगितले. औरंगाबाद कचरा प्रश्नी राज्य सरकारकडून मनपाला पूर्णपणे मदत केली जाईल. मी स्वतः बैठका घेऊन चर्चा केली असून तीन ते चार तात्पुरत्या भूमी ठरविल्या आहेत असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. जनतेला विश्वासात घेतले जात असून बायो मायनिंगच्या माध्यमातून क्षेपन भूमी साफ करू असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

औरंगाबादच्या कचरा प्रश्नावर चर्चा
औरंगाबाद शहरामध्ये पेटलेला कचरा प्रश्न विधीमंडळ पक्षनेते अजित पवार यांनी सभागृहामध्ये उचलून धरला. अजित पवार यांनी देशात आणि राज्यात स्वच्छ भारत अभियान सुरु आहे आणि दुसरीकडे औरंगाबादमध्ये कचऱ्याचा ढिग रचला जात आहे. या कचऱ्यामुळे लोकांना दुर्गंधीला सामोरे जावे लागत आहे. त्या कचरा प्रश्नावर लोकं आंदोलन करत आहेत त्यांच्यावर लाठीचार्ज केला जात आहे. त्या लोकांचा दोष काय असा सवाल अजित पवार यांनी केला. औरंगाबादकरांना हा विषय सभागृहामध्ये येवून न्याय मिळेल असे वाटत आहे. त्यामुळे हा महत्वाचा प्रश्न इथे आणावा लागला आहे. आता कचरा प्रश्नावर त्यांना योग्य न्याय मिळणार आहे का? कचरा प्रश्नी कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी अधिकाऱ्यांना कुणाची परवानगी घ्यावी लागणार नाही अशा सूचना किंवा अधिकार सरकारने दयावेत अशी मागणी अजित पवार यांनी केली. यावेळी औरंगाबादचे आमदार इम्तियाज जलील यांनीहि औरंगाबादच्या समस्येवर बोलताना लोकांचा तीव्र विरोध असल्याचे सांगितले. लोकांचा सरकारवर विश्वास राहिलेला नसून कचऱ्याच्या गाड्या फोडल्या जात आहेत तसेच गाडी आली तर लोकं आत्महत्या करतील असेही त्यांनी सांगितले.

कुठल्याही मनपाला क्षेपन भूमी देण्यात येणार नाही
यावर मुख्यमंत्र्यांनी औरंगाबाद महानगरपालिकेला पूर्ण सहकार्य करणार आहोतच शिवाय शास्त्रशुध्द पध्दतीने कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी निधी देणार असल्याचे सांगतानाच कचऱ्याच्या विल्हेवाट लावण्यासाठी तीन जागा ठरवल्या गेल्या आहेत. याअगोदर कचरा प्रश्नावर बैठक झाली आहे परंतु औरंगाबादची पुन्हा बैठक घेवू आणि मार्ग काढू असे आश्वासन दिले. सोबतच यापुढे कुठल्याही मनपाला क्षेपन भूमी देण्यात येणार नसल्याचे देखील त्यांनी सांगितले. यावेळी मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, नव्या तंत्रज्ञानाचा वापर करून अनेक सोसायट्या आपला कचरा स्वतः नष्ट करत आहेत. पुण्यात कचऱ्यापासून विद्युती निर्मिती केली जात असल्याचे त्यांनी सांगितले. असेच उपक्रम राबवून कचरा व्यवस्थापन करण्यासाठी विशेष मोहीम राबविली जाईल असे मुख्यमंत्री म्हणाले.