राज्य परीक्षा परिषदेच्या परीक्षांच्या तारखा जाहीर

0

पुणे । महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडून इयत्ता पाचवी व आठवीसाठी घेण्यात येत असलेली शिष्यवत्ती परीक्षा 18 फेब्रुवारी 2018 रोजी घेण्यात येणार असून यासंदर्भातील अधिसूचना 3 ऑक्टोबर रोजी काढण्यात येणार आहे. तसेच वर्षभरात ज्या परीक्षांचे आयोजन परिषदेकडून करण्यात येणार आहे. त्या परिक्षांचे वार्षिक वेळापत्रक पहिल्यांदाच परीक्षेच्या काही महिने आगोदर जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती परिषदेचे आयुक्त सुखदेव डेरे यांनी दिली आहे.

यंदा पहिल्यांदाच परीक्षा परिषदेने 2017-18 वर्षातील सर्व परिक्षांचे वेळापत्रक संकेतस्थळावर जाहीर केले आहे. या वेळापत्रकानुसार आत्तापर्यंत ट्रेन्ड टिचर्स सर्टिफिकेट फॉर अँग्लो इंडियन स्कूल (टीटीसी परीक्षा), राष्ट्रीय इंडियन मिलेटरी कॉलेज परीक्षा, डी.टी.एड/डी.एल.ई.डी, महाराष्ट्र शिक्षक परिक्षा अर्थात टिईटी, शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र परीक्षा व लघुलेखन परीक्षा, शासकीय संगणक टंकलेखन प्रमाणपत्र परीक्षा इंग्रजी व मराठी, हिंदी घेण्यात आल्या आहेत. यापुढे 29 सप्टेंबर रोजी शासकीय संगणक टंकलेखन विशेष कौशल्य परिक्षा (जीसीसी-एसएसडी-सीटीसी) घेण्यात येणार आहे. या परीक्षेची अधिसूचना मंगळवार काढण्यात येणार आहे. तसेच राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षा 5 नोव्हेंबर रोजी घेण्यात येणार आहे. डि.टी.एड/डी.एल.ई.डी पुर्नपरीक्षेसंदर्भातील अधिसूचना 1 सप्टेंबर रोजी काढण्यात येणार असून ही परीक्षा 21 ते 30 नोव्हेंबर दरम्यान होणार आहे.

राष्ट्रीय इंडियन मिलीटरी कॉलेज परीक्षा 1 व 2 डिसेंबर रोजी होणार आहे. राष्ट्रीय अर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षा 3 डिसेंबर रोजी होणार असून यासंदर्भातील अधिसूचना 25 सप्टेंबर रोजी काढण्यात येणार आहे. विभागीय सेवा प्रवेशोत्तर परीक्षा गट क (लिपीक, पर्यवेक्षक, सहा.शिक्षण उपनिरीक्षक) हि परीक्षा 27 ते 29 डिसेंबर रोजी होणार असून यासंदर्भातील अधिसूचना 2 ऑक्टोबर रोजी काढण्यात येणार आहे. शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र परीक्षा (लघुलेखन) 28 ते 31 डिसेंबर दरम्यान होणार असून याची अधिसूचना 24 ऑक्टोबरला काढण्यात येणार आहे. शासकीय संगणक टंकलेखन प्रमाणपत्र परीक्षा 1 जानेवारी 2018 ते 12 जानेवारी 2018 दरम्यान घेण्यात येणार असून याची अधिसूचना देखील 24 ऑक्टोबर रोजी काढण्यात येणार आहे.

सहावी ते आठवीसाठी गुणोत्सव परीक्षा 27 मार्च 2018 रोजी घेण्यात येणार असून यासंदर्भातील अधिसूचना 3 जानेवारी 2018 ला काढण्यात येणार आहे. तसेच शेवटी शासकीय संगणक टंकलेखन विशेष कौशल्य परीक्षा (जीसीसी-एसएसडी-सीटीसी) 29 मार्च 2018 रोजी घेण्यात येणार आहे. या परीक्षेची अधिसूचना 2 फेब्रुवारी 2018 रोजी काढण्यात येणार असल्याची माहिती परिक्षा परिषदेकडून देण्यात आली आहे. तसेच हे संभाव्य वेळापत्रक असून यात होणारे बदल वेळोवेळी कळवले जाणार असल्याचेही सांगण्यात आले.