मुंबई । राज्यातील शालेय शिक्षण व क्रीडा, सार्वजनिक आरोग्य आणि पाणीपुरवठा व स्वच्छता या तीन विभागांतर्गत निवडक क्षेत्रामध्ये वैशिष्ट्यपूर्ण काम करण्यासाठी मलेशियाच्या प्रशासकीय व्यवस्थेतील पेमांडू, या युनिटच्या माध्यमातून राबविण्यात येणारी बिग फास्ट रिजल्ट (बीएफआर) ही कार्यपद्धती राबविण्यास राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली.
निती आयोगाच्या धोरणानुसार निर्णय
मलेशिया शासनाने विशिष्ट कार्यपद्धती विकसित केली असून ती बिग फास्ट रिजल्ट या नावाने ओळखली जाते. निती आयोगाने पेमांडू या संस्थेसोबत सामंजस्य करार केला असून ही कार्यपद्धती भारतात राबविण्याचा निर्णय घेतला आहे. प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांचा दर्जा उंचावणे, आदिवासी बहुल जिल्ह्यांत करुन नवजात अर्भक मृत्यू दर एक अंकामध्ये आणणे, बंद ग्रामीण पाणीपुरवठा योजना पुनर्जीवित करणे या क्षेत्रांमध्ये ही कार्यपद्धती अवलंबण्यात येईल.
तारांकित हॉटेल उभारणीस चालना
पर्यटन क्षेत्राच्या विकासासाठी संबंधित संस्थांच्या विकास नियंत्रण नियमावलीमध्ये सुधारणा करण्यास मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. गुंतवणूक आकर्षित करणे, रोजगाराच्या संधी निर्माण करणे आणि विकास दर वाढविणे यासाठी तरतुदी करण्यात आल्या आहेत. पर्यटन घटकांचे मेगा प्रोजेक्ट, अल्ट्रा मेगा प्रोजेक्ट आणि लार्ज टुरिझम युनिट असे वर्गीकरण करण्यात आले असून त्यानुसार त्यांना आर्थिक सवलतीदेखील देण्यात आल्या आहेत.