राज्य बँकेच्या माजी संचालकांचे धाबे दणाणले!

0

मुंबई:- काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे वर्चस्व असलेल्या राज्य सहकारी बँकेतील सुमारे 1400 कोटी रुपयांच्या अनियमिततेबाबतची थांबलेली चौकशी पुन्हा सुरू झाल्याने माजी संचालकांचे धाबे दणाणले आहेत. अधिकारी शिवाजीराव पहीनकार यांनी पुन्हा चौकशी सुरू केल्यामुळे माजी संचालक मुंबईत दाखल झाले आहेत. गेल्या दोन दिवसापासून संचालकांची चौकशी सुरू आहे. सहकार कायद्यानुसार एखाद्या प्रकरणाची चौकशी अडीच वर्षांपेक्षा जास्त कालावधीत करता येत नाही त्यामुळे पहीनकर यांनी डिसेंबर 2016 मध्ये चौकशी तूर्तास थांबवली होती. त्यामुळे संचालकांनी सुटकेचा निश्वास टाकला होता. परंतु मार्च 2017 मध्ये अर्थसंकल्पीय अधिवेशनात सहकार कायद्यात दुरुस्ती करून चौकशीचा कालावधी तपास पूर्ण होईपर्यंत वाढविण्यात आला आहे. या सुधारित सहकार कायद्याच्या आधारानुसार गेल्या दोन दिवसांपासून माजी संचालकांची चौकशी सुरू केल्याने त्यांचे धाबे दणाणले आहेत.

संचालकांना फुटला घाम
राज्य बँकांनी साखर कारखान्यांना 1400 कोटीचे कर्ज दिले होते. यामध्ये अनियमितता आढळल्याने चौकशी करण्याचे आदेश दिले होते. गेल्या साडेसहा वर्षांपासून या प्रकरणाची चौकशी सुरू आहे. सध्या या माजी संचालकांची चौकशी यशवंतराव चव्हाण सेंट्रल ऐवजी राज्य बँकेच्या मुख्यालयात हलविण्यात आले आहे. चौकशीत संबंधित माजी संचालकांवर जबाबदारी निश्चित का करू नये? असे विचारणा करणारे पत्रच बजावल्याने संचालकांना घाम फुटला आहे. चौकशीला आलेले हे संचालक सध्या राज्य बँकेच्या आजूबाजूच्या हॉटेलमध्ये वास्तव्यास असून आपला नंबर कधी येईल याकडे त्यांचे लक्ष लागून आहे.

पत्र वाचण्यासाठी नेमले वकील
प्रत्येक संचालकांना या घोटाळ्याबाबत विचारणा करणारे पत्र किमान अडीच हजार पानांचे असल्याचे समजते. त्यामुळे ते वाचताना त्यांची चांगलीच दमछाक झाली आहे. प्रत्येकाने यासाठी हायकोर्टाचे वकील नियुक्त केले आहेत. या वकिलांची फी काही लाखात असल्यामुळे अनेकांना ती परवडत नसली तरी नाईलाज म्हणून ती द्यावीच लागत आहे. चौकशीमध्ये साखर कारखान्याच्या स्थापनेपासून संचालकांच्या किती मिटिंग झाल्या ? विविध वित्तीय संस्थेच्या किती कर्ज घेतले होते? निवडणुका किती लढविल्या? कितव्यांदा संचालक झालात? इत्यादी माहिती विचारून त्यांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले गेले आहे.