नवी दिल्ली । राज्यात नुकत्याच झालेल्या नगरपालिका निवडणुकांच्या निकालात भारतीय जनता पक्षाने बाजी मारल्याचे आणि त्यामुळे भाजपाला राज्यात पहिल्या क्रमांकाचा पक्ष म्हणून नव्याने ओळख मिळाली आहे. शिवसेनेसोबत युती करून भाजपाने सत्तेवर मांड कायम केली. मात्र, त्यांनतरही जेथे शक्य आहे तेथे भाजपाने शिवसेनेचा पाणउतारा करण्यास मागे पुढे पाहीले नाही. त्यामुळे आगामी दहा महानगरपालिका आणि जिल्हा परिषदांच्या निवडणुकांच्या पार्श्वभुमीवर ठाण्यात होणार्या भारतीय जनता पक्षाच्या प्रदेश कार्यकारीणीत राजकीय ठरावात भाजपाच्या भविष्यातील वाटचालीचा वेध घेतला जाणार आहे. त्यामुळ या कार्यकारीणीत ‘सबकुछ सिएम’ असा माहोल बघायला मिळण्याची शक्यता भाजपातील सूत्रांनी दिली आहे.
यशाचे श्रेय फडणवीसांनाही !
भारतीय जनता पक्षाला पूर्वी जो जनाधार होता तो काही महत्वाच्या विभागांतून फारसा वाढला नाही मात्र गेल्या काही दिवसांपासून भारतीय जनता पक्षाने राज्याच्या अनेक विभागातून जनाधार मिळवण्यात यश मिळवले आहे, भाजपाने 71 नगराध्यक्ष थेट निवडून आणले असून त्यांचे हजार पेक्षा जास्त नगरसेवक राज्यात वेगवेगळ्या विभागातून विजयी झाले आहेत. राज्यात मराठा मोर्चा आणि त्यांनतर निर्माण झालेल्या नोटबंदीच्या वातावरणातही भाजपाने आपली आगेकूच जारी ठेवली त्यामुळे याचे श्रेय पंतप्रधान मोदी यांच्या प्रमाणेच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांना जाते. गुजरात मध्ये नुकत्याच झालेल्या पंचायत निवडणुकांत भाजापाला पिछेहाट पहावी लागल्याने मोदी आणि आमित शहा यांच्या स्वराज्यात भाजपाची स्थिती दयनीय झाली असताना राज्यात भाजपाला मुख्यमंत्री फडणविस यानी नेमकी दिशा दिल्याबाबत त्यांचे अभिनंदन यावेळी कार्यकारीणीच्या बैठकीत केले जाण्याची शक्यता आहे. गेल्या काळात मुख्यमंत्री फडणविस याच्या नेतृत्वात विधान परिषदांच्या निवडणुकीत देखील पक्षाची शक्ति वाढविण्यात त्यांना यश मिळाले होते त्यामुळे भाजपाच्या ठाण्यात होणार्या प्रदेश कार्यकारीणीत सब कुछ फडणविस असा माहोल असण्याची शक्यता भाजपातील सूत्रांनी व्यक्त केली आहे.