सोलापूर : राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यासाठी अखेर मुहूर्त सापडला आहे. दिवाळीपर्यंत राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार करणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. सोलापुरात एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी याबाबत माहिती दिली. याआधी नवरात्रीत विस्तार केला जाणार असल्याचं बोललं जात होतं. मात्र आता स्वत: मुख्यमंत्र्यांनीच दिवाळीपर्यंत हा विस्तार करणार असल्याचं सांगितलं आहे.
राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार प्रदीर्घ काळापासून रखडलेला आहे. ठराविक कालावधीनंतर मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा रंगत असते. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस आणि रावसाहेब दानवे हे मंत्रिमंडळ विस्तारासह विविध विषयांवर चर्चा करण्यासाठी दिल्लीत गेले होते. पक्षाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांचा मंत्रिमंडळात समावेश करुन त्यांचे पुनर्वसन करण्याबाबतही चर्चा झाल्याची माहिती सुत्रांकडून मिळाली होती. महामंत्री रामपाल यांच्याबरोबर सुमारे ४ तास बैठक झाली होती. यात विविध विषयांवर चर्चा करण्यात आली होती. मात्र, आता मुख्यमंत्र्यांनीच राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार दिवाळीपर्यंत करणार असल्याचे सांगितल्याने मंत्रिमंडळात कोणाला स्थान मिळणार याकडेच सर्वांचे लक्ष लागणार आहे.