राज्य मंत्रिमंडळ विस्ताराच्या हालचाली सुरू

0

28 नोव्हेंबरला मोदी, शाह, फडणवीस यांची बैठक

मुंबई/अहमदाबाद : देवेंद्र फडणवीस यांनी अहमदाबादमध्ये भाजपाध्यक्ष अमित शाह यांची मंगळवारी भेट घेतली. मंत्रिमंडळ विस्ताराबाबत या बैठकीत चर्चा करण्यात आली. अंतिम निर्णयासाठी 28 नोव्हेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह आणि मुख्यमंत्री यांची बैठक होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. यावेळी मुख्यमंत्र्यांसोबत महसूलमंत्री चंद्रकांत पाटीलही उपस्थित होते. दरम्यान, मुख्यमंत्र्यांच्या मंगळवारच्या गुजरात भेटीपूर्वी सोमवारी सायंकाळी मुख्यमंत्री आणि नारायण राणे यांचीही मुंबईत बैठक झाली होती. गुजरात निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मंदावलेल्या राज्य मंत्रिमंडळ विस्ताराच्या हालचाली आता पुन्हा सुरू झाल्या आहेत. मध्यतंरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिमंडळ विस्ताराचे स्पष्ट संकेत दिल्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले होते. आता पुन्हा राज्य मंत्रिमंडळ विस्ताराच्या हालचाली सुरू झाल्याचे दिसून येत आहे.

28 तारखेची बैठक महत्त्वाची
मोदींसोबत होणार्‍या बैठकीत मंत्रिमंडळ विस्ताराचा मुहूर्त ठरण्याची शक्यता आहे. कुणाची गच्छंती होणार आणि कुणाची वर्णी लागणार, याचा निर्णय 28 नोव्हेंबरच्या बैठकीत होऊ शकतो. गुजरात निवडणुकीनंतर ही बैठक ठरवण्यात आली आहे. गुजरातमधील मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत केवळ गुजरात निवडणुकीवरच चर्चा झाल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. राज्यातील कार्यकर्त्यांच्या भावना अमित शहांपर्यंत पोहोचवल्या. गुजरातमध्ये प्रचारासाठी जाणार आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले.

मुख्यमंत्र्यांची राणेंशीही चर्चा
दरम्यान, महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे नेते नारायण राणे यांनी मुख्यमंत्र्यांची सोमवारी संध्याकाळी 6 वाजता भेट घेतली. या भेटीला नारायण राणे यांनी दुजोरा दिला असला तरी चर्चा नेमकी कशावर झाली, याबाबत त्यांनी मौन बाळगले. विधान परिषद पोटनिवडणुकीबाबतची भूमिका पत्रकार परिषद घेऊन लवकरच जाहीर करु, असे ते म्हणाले. मात्र, मुख्यमंत्री आणि राणे यांच्या भेटीत मंत्रिमंडळ विस्ताराबाबत चर्चा झाल्याचे सुत्रांनी सांगितले.