राज्य मंत्रीमंडळाचा विस्तार मे महिन्यात

0

मुंबई (सीमा महांगडे) – गेले काही दिवस मंत्रीमंडळाच्या विस्ताराच्या सुरु असलेल्या चर्चांना आता मे महिन्याच्या दुसर्‍या आठवड्यात पुर्णविराम मिळणार असून भाजप आणि शिवसेना यांच्या मंत्र्यांच्या खात्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर बदल अपेक्षित आहेत. तसेच स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते ज्यांना गेल्या मंत्रीमंडळ विस्तारात भाजपाच्या कोट्यातून राज्यमंत्री पद मिळाले असे कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्यावर विषेश मेहेरबानी होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

सदाभाऊ खोत यांचा मुलगा सागर खोत जिल्हा परीषदेच्या निवडणुकीत उमेदवार असताना त्याच्या प्रचाराला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी गेले नाही. तेव्हापासून राजू शेट्टी व सदाभाऊ खोत यांच्या विसंवाद निर्माण झाला आहे. त्यानंतर राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु असताना शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली शेतकर्‍यांनी विधानभवनासमोर केलेल्या आंदोलनादरम्यानही सदाभाऊ खोत यांनी शेट्टी यांना भेटण्यास नकार दिला होता.

या घडामोडींनतर खोत भाजपाच्या वाटेवर असल्याच्या चर्चेने जोर धरला आहे. त्यातच खोत यांना पाणीपुरवठा आणि स्वच्छता राज्यमंत्री पद दिले गेले, तसेच त्यांना सातार्‍याचे सहपालकमंत्रीपदही बहाल केले, तेव्हाच ते भाजपच्या वाटेवर गेले आहेत, केवळ औपचारिक घोषणा बाकी आहे, असे वातावरण निर्माण झाले होते. आगामी विधानसभा निवडणुकीत सदाभाऊ खोत भाजपाकडून राष्ट्रवादी काँग्रेसचे जयंत पाटील यांच्या विरोधात लढतील, असेही सूत्रांनी सांगितले. त्यामुळे पुढील महिन्यात होणार्‍या मंत्रीमंडळ विस्तार व फेरबदलात खोत यांच्यावर विषेश मेहरबानी होण्याची शक्यता आहे.