बारामती । बारामती-फलटण या महत्त्वाच्या रखडलेल्या राज्यमहामार्गावरील पूल जोरदार पावसामुळे वाहून गेला आहे. सुदैवाने यात कोणतीही जीवित हानी झालेली नाही. मात्र, शेजारील पिकांची प्रचंड नासधूस झालेली आहे. याच पुलाशेजारी नवीन पुलाचे अर्धवट अवस्थेत काम रखडलेले आहे. गेली सात वर्ष हा पूल अर्धवट अवस्थेत असून येथे मोठ्या प्रमाणात अपघात झालेले आहेत. या अपघातात सात जणांचा मृत्यूही झालेला आहे. तरीही रस्त्याचे काम अर्धवटच आहे.
बारामती-फलटण या रस्त्यावरील सोमंथळी हद्दीत जवळपास ८० ते १०० फूट लांब असणारा हा जुना पूल जोरदार पावसामुळे रात्री वाहून गेला. यामुळे बारामती-फलटण या राज्यमहामार्गावरील संपर्क तुटलेला आहे. हा पूल वाहून गेल्यामुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे.
वाहतूक ठप्प
बारामती एसटी आगाराच्या बसेस सांगवीपर्यंत धावत आहेत. या रस्त्यावर मालवाहतूक मोठ्या प्रमाणात होत असते. ती पूर्णत: थांबलेली आहे. अहमदनगर, सातारा, सांगली, शिर्डी, पाथर्डी, श्रीगोंदा, जामखेड, औरंगाबाद अशा लांब पल्ल्याच्या बसेस या मार्गावरून धावतात. पूल वाहून गेल्यामुळे रात्रीपासून संपूर्ण वाहतूक व्यवस्था ठप्प झाली आहे. फलटण ते बारामती या रस्त्यावर खड्डे पडले आहेत. त्यामुळे वाहन चालविणे धोक्याचे झाले आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकार्यांनीे या ठिकाणी धाव घेऊन रस्ता सुरळीत करण्याचे काम सुरू केले आहे.